शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी संस्थेत अभियंता दिनानिमित्त पोस्टर स्पर्धेचे आयोजन
येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत ‘अभियंता दिन’ नुकताच साजरा करण्यात आला. दि. १५ सप्टेंबर ही भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती ‘अभियंता दिन’ म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने संस्थेचे प्राचार्य डॉ. डी.एन. शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेमार्फत ‘पोस्टर सादरीकरण स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. डी. एन. शिंगाडे यांनी अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अभियंते हे देशाच्या प्रगतीचे चक्र असून ते आर्थिक आणि विविध क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्वाची भूमिका बजावतात. अभियंता म्हणून विद्यार्थ्यांवर फार मोठी जबाबदारी असून त्यांनी समाजाच्या व देशाच्या विकासासाठी कार्य करावे असे आवाहन केले. विभागप्रमुख प्रा. जयंत बोरकर यांनी विद्यार्थ्यांनी सृजनशीलता जोपासावी असा मौलिक सल्ला दिला. मायक्रो-प्रोजेक्ट तयार करताना विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञानाचा उपयोग करावा असे सांगितले.
पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे मुल्यांकन प्रा. अश्विनी रायपूरे आणि डॉ. केमल कोचे यांनी केले. सदर स्पर्धेत विद्युत विभागातील द्वितीय वर्षाच्या कु. अपेक्षा मुंगले व कु. अनुष्का आंबुलकर या प्रथम, अंतिम वर्षातील प्रफुल्ल किरणापुरे हे द्वितीय आणि निखील सारंगधर हे तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. यावेळी प्रा. गंगाधर घोडमारे, प्रा. संघर्ष पिल्लेवान, प्रा. सुमित जयस्वाल, प्रा. शरद दांडगे आणि प्रा. रोहित वळिवे उपस्थित होते.
0 टिप्पण्या