११ वी मध्ये उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश द्या अन्यथा रस्त्यावर उतरू – प्रशांत डांगे
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेत व शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मागील सत्रात इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा ह्या शालेय स्तरावर घेण्यात आल्या. त्यामुळे यावर्षी दहावीचा बऱ्याच शाळेचा निकाल १००% च्या जवळपास लागला. त्यामुळे यावर्षी इयत्ता ११ मध्ये प्रवेशा करीता विद्यार्थ्यांना भटकावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात अनेक कनिष्ठ महाविद्यालय असले तरी शिक्षणासाठी ब्रम्हपुरी शहराला पसंती दर्शवितात. त्यामुळे जिल्हा व जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येत असतात.
यावर्षी निकाल जास्त लागल्याने शहरातील व ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश क्षमता पूर्ण झाली. परंतु आजही अनेक विद्यार्थी इयत्ता ११ वी प्रवेशा पासून वंचित आहेत. आपले शैक्षणिक वर्ष वाया जाणार काय? ही चिंता विद्यार्थी व पालकांना सतावत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये व विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी पायपीट थाबवावी.
यासाठी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढवून द्यावे तसेच महाविद्यालयांना नवीन तुकडी मान्यता द्यावी या मागणी करीता रिपब्लिकन पक्ष खोरीपा ब्रम्हपुरीचे वतीने मान शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनात केली आहे.येत्या आठ दिवसात जर विद्यार्थांना कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान, कला वाणिज्य किंबहुना विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार प्रवेश देण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन पक्ष खोरीपा ब्रम्हपुरी च्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना जीवन बागडे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश , प्रशांत डांगे शहर अध्यक्ष, नरेश रामटेके तालुका अध्यक्ष, पदमाकर रामटेके तालुका सरचिटणीस , अमर गाडगे आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या