पावसाळ्यात विषारी दंशावर घरगुती उपचार टाळा-डॉ.अनंत पवार
कळवण तालुक्यात विषारी दंशावरील १ हजार प्रतिजैविक उपलब्ध
प्रतिनिधी, ता.२४ – पावसाळ्यात खड्डे आणि बीळामध्ये भरलेल्या पाण्यामुळे सरपटणारे प्राणी व इतर विषारी दंश करणाऱ्या कीटकांचा धोका अधिक असतो. विशेषतः शेतकरी व शेतमजूर यांना शेतातील कामे करताना अशा समस्येला सामोरे जावे लागते. ग्रामीण भागात बऱ्याच वेळा विषारी दंशाकडे दुर्लक्ष करणे किंवा घरगुती उपचार करून दुर्लक्ष केले जाते. परिणामी यामुळे दंश झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.ग्रामीण आदिवासी भागात तांत्रिक, मंत्रीकांकडून अंगारा उतरविणे, दंश झालेल्या जागेवर जडीबुटी लावणे, बिब्बा लावणे आदी प्रकार केले जातात.
काही घटनांमध्ये झालेला दंश बिनविषारी असतो परंतू घाबरून जाऊन व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असल्याचे देखील ऐकण्यास मिळाले आहे. पावसाळ्यातील या दुर्घटना टाळण्यासाठी कळवण तालुका सज्ज झाला असून, कळवण उपजिल्हा रुग्णालय व अभोणा ग्रामीण रुग्णालय अशा दोन ठिकाणी सर्पदंश व इतर विषारी किटकांच्या दंशावरील सुमारे १ हजार प्रतिजैविक उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनंत पवार यांनी दिली आहे. पावसाळ्यात शेतातील कामे करताना मोठे गमबूट वापरणे, हातात रबरी मोजे वापरणे. मोटरपंपची पेटी सुरक्षितपणे बंद करणे. शक्यतो दिवसा शेतातील कामे आवरणे आदी कामे शेतकरी बांधवानी करायला हवी. गावातील पडीत घरे, पडीत इमारती यांची वेळोवेळी साफसफाई करणे, पाळीव प्राण्यांची गोठे, पडवी येथील अडगळीच्या जागा मोकळ्या करणे आदी कामे ग्रामस्थांनी करायला हवीत. घरगुती उपचार न करता रुग्णांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल होऊन प्रतिजैविके घ्यावीत असे ही आवाहन उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया – कळवण उपजिल्हा रुग्णालय तसेच अभोणा येथील ग्रामीण रुग्णालय येथे विषारी दंशावरील १ हजार प्रतिजैविके उपलब्ध असून, शेतकरी व अन्य नागरिकांनी घरगुती उपचार न करता तात्काळ रुग्णालयात दाखल व्हावे.- डॉ. अनंत पवार ( वैद्यकीय अधीक्षक, कळवण उपजिल्हा रुग्णालय )


0 टिप्पण्या