Advertisement

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी नागपूर स्मार्ट सिटीतर्फे जनजागृती रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी नागपूर स्मार्ट सिटीतर्फे जनजागृती रॅली

नागपूर, ता. २ : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”च्या अनुषंगाने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये लहान मुले महात्मा गांधी यांच्या वेषात उपस्थित होते. रॅली व्हेरायटी चौकातून ग्लोकल मॉल पर्यंत काढण्यात आली.

सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल समोर आयोजित कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, महापौर दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेविका रूपा राय, उज्ज्वला शर्मा, नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस, स्मार्ट सिटीचे संचालक अनिरुद्ध शेनवई आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, आज महात्मा गांधी यांचे विचार स्थापित करायचे असेल तर ते केवळ गांधीजींच्या विचारांवर मार्गक्रमण करूनच शक्य आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गांधीजींच्या विचारांपासून प्रेरणा घेत त्यांना आदर्श मानून स्वच्छ भारत मिशन हाती घेतले. महात्मा गांधी यांच्या स्वावलंबीपणाच्या विचारांचा अंगीकार करून आपण सर्व मिळून भारताला स्वच्छतेच्या नव्या पैलतीरावर घेऊन जाऊ शकतो. गांधीजींच्या जयंतीदिनी प्रत्येकाने स्वच्छतेप्रति आपले समर्थन, समर्पण आणि संरक्षण देण्याचे संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी देशाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे कार्य केले, असेही ते म्हणाले.

मनपा आणि स्मार्ट सिटीतर्फे स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज अंतर्गत सीताबर्डी येथील बाजार विकसीत करण्यात येत आहे. हा महत्वपूर्ण पुढाकार असून यामुळे सीताबर्डी येथे व्यवसाय करणारे दुकानदार, हॉकर्स आणि मार्केटिंग करणाऱ्या व्यक्तींसाठी नव्या संधीची नांदी ठरणार आहे. त्यांना यामुळे मोठा फायदा सुद्धा होऊ शकेल. सीताबर्डी बाजारातील या प्रकल्पाला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढे शहरात इतर ठिकाणी सुद्धा याची अंमलबजावणी करण्याचा मानस आहे, असेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.

विरोधी पक्षनेता तानाजी वनवे यांनी सुद्धा याप्रसंगी आपले मत व्यक्त केले. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांवर प्रकाश टाकला.

प्रारंभी व्हेरॉयटी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. रॅलीमध्ये डॉ. नरेश अग्रवाल, डॉ. प्रवीण गुप्ता, डॉ. अनीषा अग्रवाल यांनी महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांची वेशभूषा धारण केली होती. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना प्लास्टिकचा वापर बंद करा, तंबाखूचे सेवन करू नका, पर्यावरणाचे रक्षण करा आदी संदेश देण्यात आले. कार्यक्रमात जेसीआय नागपूर रॉयलचे राजेश दुबे, लॉयन्स क्लबचे उमेश महतो, विनोद जायस्वाल आदी संघटनांनी सहकार्य दिले.

यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेले दिव्यांश दुबे आणि आदीत्री सरकार यांचा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लॉयन्स क्लबचे डॉ. नरेश अग्रवाल, डॉ. प्रवीण गुप्ता व डॉ. आशिया अग्रवाल स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज अंतर्गत सुमित आशिया आर्किटेक्ट नागपूर व दि ब्लॅंक स्लेट मुंबई यांना महापौर दयाशंकर तिवारी यांनी सन्मानित केले. स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस यांनी लहान गांधी तिर्थक डोंगरवार यांचा सत्कार केला. तसेच त्यांनी इंडिया सायकल फार चेंज चॅलेंज, स्ट्रीट फॉर पीपल इत्यादी प्रकल्पात सहकार्य करणारे हर्षल बोपर्डीकर, नागपूर चे बायसायकल मेयर, आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांचा सुद्धा सत्कार केला.

कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, शुभांगी पोहरे, अंजली तिवारी यांनी केले. यावेळी स्मार्ट सिटीच्या कंपनी सचिव भानुप्रिया ठाकूर, मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, राजेश दुफारे, डॉ. प्रणिता उमरेडकर, मनजीत नेवारे, गुड्डी उजवणे, डॉ. शील घुले, राहुल पांडे, डॉ. पराग अरमल, अमित शिरपुरकर, अनूप लाहोटी, परिमल ईनामदार, आरती चौधरी, आरजूलता, विजया सावरकर, सोनाली गेडाम आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या