Advertisement

पीओपी ची मूर्ती आढळल्यास त्वरीत सर्व मूर्ती जप्त करून दुकान सील करण्याचे निर्देश! चार फुटावरील मूर्तीही जप्त होणार

पीओपी ची मूर्ती आढळल्यास त्वरीत सर्व मूर्ती जप्त करून दुकान सील करण्याचे निर्देश! चार फुटावरील मूर्तीही जप्त होणार

नागपूर:-बंदी असलेल्या पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात नागपूर महानगरपालिके द्वारे संपूर्ण नागपूर शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत मंगळवारी दि.७ दहा पैकी पाच झोनमध्ये कारवाई करण्यात आली.याअंतर्गत शहरातील ९० पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व मूर्ती विक्रेत्यांकडून एक लाख २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या शिवाय पीओपी गणेश मूर्तींची विक्री करणारी दोन दुकाने हटविण्यात आली.

पीओपी मूर्तीसंदर्भात सुरू असलेल्या कारवाईमध्ये उपद्रव शोध पथकाद्वारे शहरातील लक्ष्मीनगर,धरमपेठ,हनुमाननगर,नेहरूनगर आणि मंगळवारी या पाच झोनमधील  १०६ दुकानांची तपासणी करण्यात आली त्यातील ९० पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या.

सर्वाधिक ५० हजार रुपये दंड हनुमाननगर झोन अंतर्गत वसूल करण्यात आला. झोनमधील २५ दुकानांची तपासणी करून ६० पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या. धरमपेठ झोनमध्ये ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या पदाधिका-यांनी मनपाच्या पथकाला पीओपी मूर्तींची ओळख पटवून देण्यात मदत केली. संस्थेच्या सहकार्याने झोनमधील १५ दुकानांची तपासणी करून २७ मूर्ती जप्त करण्यात आल्या.

दोन दुकानांना तात्काळ हटविण्यात आले. संपूर्ण कारवाईत झोनपथकाने ३० हजार रुपये दंड वसूल केला. या कार्यामध्ये ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी,सुरभी जयस्वाल,मेहुल कोसुरकर,श्रीया जोगे यांनी सहकार्य केले.

मंगळवारी झोनमधील १५ दुकानांची तपासणी करून ३ मूर्ती जप्त करण्यात आल्या व १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले.नेहरूनगर झोनमधील ३६ दुकानांची कारवाई करीत १४ हजार रुपये दंड तर लक्ष्मीनगर झोनमधील १५ दुकानांची तपासणी करून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आले.

या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले व उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी केले.झोन पथकाने कारवाईमध्ये जप्त केलेल्या पीओपी गणेश मूर्ती संबंधित झोनच्या आरोग्य अधिका-यांकडे सुपूर्द केल्या.

याशिवाय नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.७) एका दुकान/प्रतिष्ठानावर कारवाई करुन ५००० रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ५० प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

राज्य शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात गणेशाच्या पीओपी मूर्तीची खरेदी-विक्री व आयात यावर बंदी आहे.

अशात नागपूर शहरात कुठेही पीओपी (POP) मूर्तीची विक्री होणार नाही यासाठी मूर्ती विक्री करणा-या दुकानांची पारंपरिक मूर्तीकार संघटनेच्या पदाधिका-यांच्या सहकार्याने तपासणीला गती देण्यात यावी.

तपासणीमध्ये जर ज्या दुकानामध्ये पीओपी मूर्ती आढळली तर त्या दुकानातील सर्व पीओपी मूर्ती तात्काळ जप्त करून दुकानही सील करण्यात यावे व यासाठी पोलिसांची सुद्धा मदत घेण्यात यावी,असे सक्त निर्देश महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संयुक्तरित्या निर्देश दिले.

नागपूर शहरात मनपातर्फे सुरू असलेल्या पीओपी मूर्तींच्या कारवाई संदर्भात मंगळवारी (दि.७) महापौर दयाशंकर तिवारी यांनी आयुक्त सभागृहामध्ये आढावा बैठक घेतली.

बैठकीत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.,आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन,माजी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके,ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल,उपायुक्त राजेश भगत,घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले,सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड,प्रकाश वराडे,हरीश राउत,अशोक पाटील,विजय हुमने, सहायक आयुक्त सुषमा मांडगे,साधना पाटील,ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी,सुरभी जयस्वाल,मेहुल कोसुरकर आदी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी मूर्ती विक्रीची दुकाने लावण्यात आलेली आहेत. मात्र दुकानांकरिता मनपाची पूर्वपरवानगी संबंधित झोनमधून घेणे आवश्यक आहे.

त्यादृष्टीने दुकानांची तपासणी करताना त्यांच्याकडे मनपाची परवानगी आहे अथवा नाही याची शहानिशा करण्यात यावी. परवानगी नसल्यास संबंधित दुकानावर कारवाई करण्यात यावी. पीओपी मूर्ती या पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहेत.

या मूर्तींची विक्री करताना ती शाडूची भासावी याकरिता पीओपी मूर्ती विक्रेते अनेक शक्कल लढवितात. त्यामुळे या मूर्तींची ओळख पटविणे कठीण जाते. अशात शहरातील पारंपरिक मूर्तीकार संघटनेची मदत घेण्यात यावी.

मूर्तीकार संघटनेच्या पदाधिका-यांना सोबत घेउन पोलिस बंदोबस्तात दुकानांची तपासणी करून धडक कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी बैठकीत दिले.

शासनाच्या नियमानुसार घरगुती गणपती मूर्तीची उंची व रुंदी दोन फूट व सार्वजनिक गणेश मूर्ती चार फूटांपेक्षा जास्त असू नये असा नियम आहे. त्यामुळे झोनस्तरीय पथकाद्वारे कारवाई करताना मूर्ती निर्धारित आकारात असल्याचीही तपासणी करण्यात यावी. पीओपी मूर्ती प्रतिबंधासंदर्भात सर्वच झोनस्तरावर कारवाई करण्यात यावी.

सहायक आयुक्तांनी स्वत: झोनमध्ये पोलिस प्रशासन, पारंपरिक मूर्तीकार संघटनेचे पदाधिकारी व मनपाच्या उपद्रव शोध पथकासह पाहणी करून पीओपी मूर्तींची विक्री आढळल्यास तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या