दिव्यांगांच्या उत्थानासाठी दोन कोटी प्रस्तावित
मनपाच्या अर्थसंकल्पात तरतूद : विविध योजना राबविणार
नागपूर, ता. १६ : नागपूर शहरातील दिव्यांग बांधवांच्या विविध कल्याणकारी योजनांकरिता नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये दोन कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. दिव्यांग व्यक्तींकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असून २१ प्रकारच्या दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांगात्वावर मात करून त्यांचे आयुष्य स्वावलंबी, शैक्षणिक उत्थान, सामाजिक, सुदृढ आरोग्य मिळण्यासाठी मनपाच्या त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी पदभार घेतल्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी विशेष योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते. मनपा समाजविकास विभाग तर्फे दिव्यांग खेळाडूंसाठी त्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी निधी दिला आहे. तसेच त्यांना स्वंयरोजगारासाठी दोन लाखाचा निधी, ट्रायसायकिल सुध्दा मनपातर्फे दिली आहे.
नागपूर शहरातील दिव्यांग/अस्थीव्यंग व्यक्तींना कृत्रिम अवयव लावण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून पंडीत दीनदयाल अंत्योदय योजने अंतर्गत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नागपूर शहरातील गरजू व वैद्यकीयदृष्ट्या ज्यांना कृत्रिम अवयव लावण्याची गरज आहे अशांना याचा लाभ देण्यात येणार आहे. याकरिता स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी सभागृहात सादर अर्थसंकल्पामध्ये दोन कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. यासंदर्भात वैद्यकीय विभाग व समाजविकास विभागाने धोरण तयार करून एक महिन्याच्या आत स्थायी समितीपुढे मंजुरीकरिता सादर करण्याचे निर्देश स्थायी समितीने प्रशासनाला दिले आहेत.
दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनेंतर्गत कर्णबधीर दिव्यांगांना शस्त्रक्रियेकरिता अर्थसहाय्यासाठी २५ लक्ष रुपये, दिव्यांगांना वैयक्तीक स्वयंरोजगाराकरिता दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य योजनेसाठी २०० लक्ष रुपये, मतीमंद घटकातील दिव्यांगांना निर्वाह भत्ता योजनेकरिता ५० लक्ष रुपये, दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षण अर्थसहाय्य योजनेकरिता ५० लक्ष रुपये, दिव्यांगांना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य योजनेसाठी २०० लक्ष रुपये, प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक ३ अंतर्गत नासुप्र, म्हाडा व मनपातर्फे बांधण्यात येत असलेल्या मनपा हद्दीतील बांधकामाकरिता सोडत पद्धतीने निवड झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना शासन अनुदान २.५० लक्ष रुपये सह ५० हजार महानगरपालिकेकडून अर्थसहाय्य योजनेसाठी १०० लक्ष रुपये प्रस्तावित असून राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणा-या दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य योजनेकरिता १०० लक्ष रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,नागपूर


0 टिप्पण्या