जल प्रदूषण कमी करण्यासाठी नवे मलजल शुद्धीकरण केंद्र प्रस्तावित
शहरातील विविध भागात साकारणार केंद्र
नागपूर, ता. २८ : नागपूर शहरातील विविध भागातून निर्माण होणारे सांडपाणी नाले व पुढे नद्यांना जाउन मिळतात. त्यामुळे विविध समस्या निर्माण होतात. या समस्यांवर आळा घालण्याच्या दृष्टीने १९८ एम.एल.डी. सांडपाण्यावर दैनंदिन प्रक्रिया करून त्यापैकी १३० एम.एल.डी. पाणी कोराडी येथील वीज निर्मिती प्रकल्पाला पुरविण्यात येत असून त्यातून मनपाला दरवर्षी १५ कोटी उत्पन्नही प्राप्त होत आहे. मनपाच्या या यशस्वी प्रकल्पानंतर आता शहरातील विविध भागांमध्ये असे प्रकल्प साकारले जाणार आहे. नव्या अंदाजपत्रकामध्ये शहरातील विविध भागामध्ये नवे मलजल शुद्धीकरण केंद्र प्रस्तावित करण्यात आलेले आहेत.
सद्यस्थितीत नागपूर शहरात दररोज सुमारे ५०० ते ५२५ दशलक्ष लीटर सांडपाण्याची निर्मिती होते. सांडपाण्याच्या शुद्धीकरणाकरिता महानगरपालिकेने भांडेवाडी येथे १३० व २०० द.ल.लीटर प्रतिदिन क्षमतेचे दोन मलजल शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित असून या व्यतिरिक्त मनपाने ५ द.ल. लीटर क्षमतेचे प्रतिदिन दोन लघु मलनि:सारण केंद्र उभारले आहे. याद्वारे पिवळ्या नदीवर मानकापूर येथे तसेच नाग नदीवर मोक्षधाम येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. याशिवाय नागपूर सुधार प्रन्यास मार्फत एकूण ३०.३० द.ल.लीटर क्षमतेचे लघु मलजल शुद्धीकरण विविध ठिकाणी उभारण्यात आले आहे. अशा एकूण ३७०.३ द.ल.लीटर प्रतिदिन सांडपाण्याचे शुद्धीकरण होते. नागपूर शहरातील सिवर लाईनची लांबी अंदाजे १६७० किमी इतकी असून त्याचा व्यास १५० मी.मी. ते १८०० मी.मी. इतका आहे. उत्तर, मध्य व दक्षिण सिवरेज झोनमधील अंदाजे ७० टक्के भाग हा सिवरेज नेटवर्कद्वारे व्यापलेला आहे.
सांडपाण्यावर प्रक्रिया करून मलजल शुद्धीकरणासाठी मनपाद्वारे भविष्यकालीन योजनांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. नाग नदीमधील प्रदूषण रोखण्यासंदर्भात मे.एन.जे.एस. संस्थेमार्फत विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत २११७ कोटी असून यामध्ये सांडपाणी जमा करण्याची प्रणाली निर्माण करणे, काही लघु व मोठे असे एकूण १०२ द.ल.लीटर प्रतिदिन क्षमतेचे जलमल शुद्धीकरण केंद्र बांधणीचा समावेश आहे. स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी सभागृहात मांडलेल्या अर्थसंकल्पात यासाठी प्रावधान करण्यात आले आहे. अर्थसंकल्पाला मान्यता प्राप्त झाली आहे.
नागपूर महानगरपालिका हद्दीमध्ये हुडकेश्वर नरसाळा या भागाचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. या भागातून निर्माण होणा-या सांडपाण्यावर आळा घालण्याकरीता येथे २० द.ल. लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल शुद्धीकरण केंद्र बांधणे प्रस्तावित असून यासाठी १५४ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक राज्य शासनाचे अनुदान प्राप्त झाल्यास प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याशिवाय मनपाद्वारे दक्षिण सिवरेज झोनचा सुद्धा ११२१.७३ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यामध्ये ३० द.ल.लीटर प्रतिदिन क्षमतेचे जलमल शुद्घीकरण केंद्र चिखलीखुर्द येथे प्रस्तावित आहे.
नद्यांमधील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने नागपूर सुधार प्रन्यासने सुद्घा ६३.५० द.ल. लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल शुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले आहे. काचीमेअ येथे १, सोनेगाव येथे ०.३, हजारीपहाड येथे ४, सोमलवाडा-१ येथे २०, दाभा येथे ५ असे एकूण ३०.३ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित आहे. याशिवाय अंबाझरी येथे ३.२ व सोमलवाडा-२ येथे २० आणि विटाभट्टी/वांजरा येथे १० द.ल. लीटर प्रतिदिन असे एकूण ३०.२ द.ल.लीटरची कामे नासुप्र मार्फत प्रगतीपथावर आहेत.
उपरोक्त सर्व प्रस्तावित प्रकल्पांना शासनाकडून निधी प्राप्त झाल्रास २०२४ पर्यंत मलजल शुद्धीकरण केंद्र पूर्ण करण्याचा मनपाचा मानस आहे. या प्रकल्पामुळे येत्या दोन ते तीन वर्षात नागपूर शहरात निर्माण होणा-या सांडपाण्यावर पूर्णपणे प्रक्रिया करणे शक्य होणार आहे व त्यामुळे नदीमध्ये होणारे प्रदूषण कमी करता येणार आहे.
प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,नागपूर



0 टिप्पण्या