शहरातील आरोग्य सुविधा बळकट करणार : भोयर
स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांचा २७९६.०७ कोटीचा अर्थसंकल्प सादर
नागपूर, ता. २८ : कोव्हिड काळामध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता व भविष्यात येणा-या तिस-या लाटेचा धोका नागपूर शहरातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी मांडलेली संकल्पना व ते पूर्ण करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रत्यक्षात साकारणारा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी शुक्रवारी (ता.२८) सादर केले. कोव्हिड नियमांचे पालन करीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मनपाची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये नागपूर महानगरपालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे २७९६.०७ कोटी रुपये उत्पन्नाचे अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी सभागृहाला सादर केला. तत्पूर्वी महापौर दयाशंकर तिवारी यांना त्यांनी अंदाजपत्रकाची प्रत सूपूर्द केली.
यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. , अतिरिक्त आयुक्त सर्वश्री जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होते. अर्थसंकल्पावर चर्चा सोमवारी (३१ मे) रोजी सकाळी १०.३० वाजता ऑनलाईन पध्दपतीने होणार आहे.
कोव्हिड-१९ या महामारीमुळे प्रभावित झालेली मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने कठोर वित्तीय उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नमूद करीत स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी यावर्षी नवीन कामांना मोठ्या प्रमाणात हाती न घेता प्रलंबित वित्तीय दायित्व कमी करण्यावर भर दिला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे २४७६.०७ कोटी रुपये उत्पन्न आहे. सुरूवातीची शिल्लक ३२० कोटी रूपये असून या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीची अपेक्षित शिल्लक धरून एकूण उत्पन्न् २७९६.०७ कोटी रुपये गृहित धरण्यात आले आहे. हे अपेक्षित उत्पन्न गृहित धरून २०२१-२२ या आर्थिक वर्षात २७९५.७७ कोटी रुपये खर्च होणार असून मार्च अखेरची अपेक्षित शिल्लक ३० लक्ष एवढी राहणार असल्याचे स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.
आरोग्य सुविधा बळकटीकरणासाठी आरोग्य विषयक कार्यक्रम
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत निर्माण झालेली आरोग्य सुविधांची वाणवा भरून काढण्यासाठी शहरातील आरोग्य सुविधा बळकट करणारे आरोग्य विषयक कार्यक्रम अंदाजपत्रकामध्ये स्थायी समिती सभापतींनी विशेषत्वाने मांडले आहे.
– वंदे मातरम् नागरी आरोग्य सुविधा केंद्र प्रकल्प योजना
नागपूर शहरातील ज्या भागात आरोग्य सुविधा नाही, अशा भागामध्ये आरोग्य सुविधा केंद्र उभारण्याची संकल्पना महापौर दयाशंकर तिवारी यांनी मांडली होती. त्यांच्या संकल्पनेला अंदाजपत्रकाद्वारे स्थायी समिती सभापतींनी मूर्तरूप प्रदान केले आहे. १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनी नागपूर शहरामध्ये ७५ हेल्थ पोस्ट सुरू करण्यात येणार असून त्यांना ‘वंदे मातरम् नागरी आरोग्य सुविधा केंद्र’ हे नाव देण्यात येणार आहेत. देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे शहरातील शहीद जवान ज्यांना परमवीर चक्र, अशोक चक्र, वीर चक्र असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत अशा ७५ शहीद जवानांच्या नावावर ही ‘वंदे मातरम् नागरी आरोग्य सुविधा केंद्र’ राहतील. प्रत्येक केंद्रावर शहीद जवानाचे फोटो व संक्षिप्त परिचय राहिल व ठळक अक्षरात ‘मी या देशाकरिता त्याग केला आहे, आपण कधी सुरू करणार आहात’ असा राष्ट्रीय भावना जोपासणारा संदेश असेल. ही ७५ केंद्र संस्थांना संचालित करण्यासाठी देण्यात येणार असून त्यासाठी लागणारी इमारत, विद्युत, पाणी, साफ-सफाईची व्यवस्था ही महानगरपालिकेची जबाबदारी राहिल.
– महापौर दृष्टी सुधार योजना
तिरळेपणाची व्याधी असलेल्या नागपूर शहरातील सर्वांची नि:शुल्क शस्त्रक्रिया करून त्यांना त्यातून मुक्त करण्याच्या संकल्पातून महापौर दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकाराने ‘महापौर दृष्टी सुधार योजना’ सुरू करण्यात येत आहे. नागपूर महानगपालिका व महात्मे नेत्रपेढी यांच्या संयुक्त माध्यमातून ही शस्त्रक्रिया करण्यात येईल. यासाठी लागणारा सर्व खर्च शासनाच्या विविध योजनांमधून उपलब्ध करून नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी महात्मे नेत्रपेढी संस्थेची राहिल.
– महापौर नेत्र ज्योती योजना
नागपूर शहरातील प्रत्येक प्रभागात मोतीया बिंदु शस्त्रक्रियेच्या संबंधांने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून ‘महापौर नेत्र ज्योती योजनेद्वारे’ रुग्णांची नि:शुल्क मोतीया बिंदु शस्त्रक्रिया करण्याचा मनपाचा मानस आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना नि:शुल्क चष्मा पुरविण्याची जबाबदारी मनपाने घेतली आहे. ही योजना सुद्धा मनपा व महात्मे नेत्रपेढी संस्थेचा संयुक्त उपक्रम राहिल.
– महापौर जीवनावश्यक औषधी अधिकोष
गरीब व गरजू व्यक्तींना आवश्यकतेच्या वेळी जीवनावश्यक औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सामाजिक संस्था, व्यापारी संस्था, औद्योगिक घराणे, कॉर्पोरेट सेक्टर यांच्या संयुक्त सहयोगाने ‘महापौर जीवनावश्यक औषधी मेडिकल बँक’ उभारण्याचा मनपाचा मानस आहे. या योजने अंतर्गत प्राप्त होणा-या औषधांचे वाटप करण्यासाठी मनपाद्वारे निर्धारित समितीच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांचे निकष ठरवून त्यांना औषध पुरवठा केला जाईल.
– महापौर वैद्यकीय साधन सामुग्री अधिकोष
अनेक आजारांमध्ये खरेदी करण्यात आलेली साधन सामुग्री रुग्ण बरा झाल्यानंतर टाकाउ ठरते. लोक आवाहनातून सर्व वैद्यकीय साधन सामुग्री ‘महापौर वैद्यकीय साधन सामुग्री अधिकोष’यामध्ये जमा करून गरजू लोकांपर्यंत ही सेवा उपलब्ध करून देण्याचा मनपाचा मानस आहे. अशी साधन सामुग्री पुरविण्यासाठी काम करणा-या शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांची एक शिखर समिती मनपाद्वारे तयार करून त्यांच्या माध्यमातून नाममात्र दरावर गरजूंना साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल.
– माता दुग्ध अधिकोष
कोव्हिडमध्ये प्रसूतीनंतर अनेक माता कोरोनाबाधित झाल्या अशा स्थितीत बाळाला स्तनपान करणे धोक्याचे ठरू शकते. ही बाब लक्षात घेउन बाळांसाठी ‘माता दुग्ध अधिकोष’ (मदर मिल्क बँक) निर्माण करण्याचा मनपाने संकल्प केला आहे. माता व बाल संगोपन समितीच्या माध्यमातून पाचपावली सूतिकागृह येथे ही योजना कार्यान्वित करण्यात येईल.
– सिकलसेल डे केअर व अनुसंधान केंद्र
सिकलसेल बाधितांचे निदान व उपचार एका छताखाली एकत्रितदृष्ट्या व्हावे या हेतूने मनपाच्या पाचपावली सूतिकागृह येथे यावर्षीपासून ’सिकलसेल डे केअर व अनुसंधान केंद्र’ सुरू करण्याचा मनपाचा मानस स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी व्यक्त केला. भारत सरकार, नागपूर महानगरपालिका व महात्मे नेत्र पेढी यांच्या संयुक्त माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येईल. लहानात लहान ते मोठ्यात मोठी अशा सर्व तपासण्या या केंद्राद्वारे नि:शुल्क केल्या जातील. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर संपूर्ण विदर्भातच नव्हे तर देशात सिकलसेल अनुसंधान केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास स्थायी समिती सभापतींनी व्यक्त केला.
– धोकादायक व जोखिम असलेल्या कामांचे यांत्रिकीकरण
धोकादायक व जोखिम असलेल्या कामांच्या यांत्रिकीकरणास आरोग्य विभागाद्वारे तीन वर्षापासून सुरूवात झालेली आहे. शहराची व्याप्ती लक्षात घेता शासकीय अनुदानातून व मनपाच्या सहभागातून मशीनरी व इतर साहित्य काही प्रमाणात खरेदी करण्यात आले आहेत. सर्व धोकादायक कामांचे १०० टक्के यांत्रिकीकरण करण्याचा मनपाचा मानस आहे.
वेळेत कर भरल्यास सूट
चालू आर्थिक वर्षाची पूर्ण मालमत्ता कर रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत ३० जून पूर्वी जमा केल्यास सामान्य कराच्या रक्कमेत १० टक्के तर ३१ डिसेंबरपूर्वी पूर्वी जमा केल्यास सामान्य कराच्या रक्कमेत ५ टक्के सूट दिली जाणार आहे. याशिवाय आता मालमत्ता कर देयकावर क्यू आर कोड छापण्यात येणार असून त्या माध्यमातूनच मालमत्ता कर भरता येणार आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर व इतर आय संकलनातून २८९.४३ कोटी उत्पन्न अपेक्षित असल्याचेही स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी सांगितले.
पाण्यासाठी ’वन टाईम सेटलमेंट’ योजना कायम
शहरातील अवैध नळ कनेक्शनचा शोध घेण्याची विशेष मोहिम राबवून अनधिकृत नळ कनेक्शन घेतलेल्या नागरिकांकडून ’वन टाईम सेटलमेंट’ योजने अंतर्गत अनधिकृत नळांचे कनेक्शन नियमित करण्याची योजना या वर्षीही तशीच कायम ठेवण्याची मागणी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी केली. त्यामुळे जलप्रदाय विभागाच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०२१-२२ या वर्षाकरिता पाण्याची करेत्तर आय व इतर आय स्त्रोतापासून २०१.०४ कोटी अपेक्षित आहे.
सुपर ३०च्या धर्तीवर सुपर ७५
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्ती निमित्त नागपूर शहरामध्ये आनंद कुमार यांच्या सुपर ३० या शैक्षणिक चळवळीच्या धर्तीवर सुपर ७५ सुरू करण्याची महापौर दयाशंकर तिवारी यांची संकल्पना आहे. त्या अंतर्गत मनपाच्या शाळांमध्ये चाचणी परीक्षेद्वारे आठव्या वर्गाच्या ७५ विद्यार्थ्यांची निवड करून त्यापैकी २५ विद्यार्थ्यांना जेईई, २५ विद्यार्थ्यांना पीएमटी आणि २५ विद्यार्थ्यांना एनडीए चे शिक्षण सलग ४ वर्ष देउन विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षण देउन निपून करून चांगल्या ठिकाणी पाठविण्याचा संकल्प शहरातील नामवंत शिकवणी वर्गाच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे.
स्थायी सभापतींनी मानले सर्वांचे आभार
अर्थसंकल्पाला सुरूवात करताना स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी असल्याची भावना व्यक्त केली. तर अर्थसंकल्पाच्या शेवटाला त्यांनी शहरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्षनेते, पत्रकार, महापौर, उपमहापौर, सत्तापक्ष नेते, विरोधी पक्षनेते, सर्व माजी स्थायी समिती सभापती, सर्व पक्षांचे गटनेते व पदाधिकारी, स्थायी समितीचे सर्व सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, मनपा आयुक्त, अधिकारी, कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
– भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाच्या निर्माणात अंशदान म्हणून २ कोटी रुपयांची तरतूद
– बाळासाहेब ठाकरे स्मृती शैक्षणिक कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्र निर्माण कार्याच्या प्रथम चरण कामासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद
– स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्ती निमित्त शहरातील ७५ चौकांच्या सौंदर्यीकरणासाठी तरतूद
– स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्ती शहरातील निवासी असलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींच्या घरासमोर नामफलक लावून त्यांचे कार्य चिरस्मरणीय ठेवण्याची महापौरांची संकल्पना
– शेषनगर मौजा चिखली येथे एकाच ठिकाणी ‘ट्विन इएसआर’ बनविण्यासाठी अपेक्षित ७२ कोटी खर्चाची तरतूद
– नागपूर महानगरपालिकेच्या इमारती, बगीचे यासह रस्त्यालगत २०९ जागी ‘रिचार्ज शाफ्ट’द्वारे रेन वाटर हार्वेस्टिंग
– शहरातील १२ बगीच्यालगत वाहणा-या नाल्यांवर एसटीपी संयंत्र बसवून त्या पाण्याचा पावस बगीच्यात करणे, यासाठी १.२१ कोटी खर्चाची तरतूद
– मनपाची गरोबा मैदान येथील जीर्ण अवेस्थेतील शाळा पाडून त्या ठिकाणी वैद्यकीय प्रयोगशाळा व रोगनिदान करणारी अत्याधुनिक प्रयोगशाळेच्या बांधकामास ५ कोटीची तरतूद
– कोव्हिडमुळे भविष्यात शहरात प्राणवायूचा तुटवडा निर्माण होउ नये याकरिता मनपाद्वारे १००० ऑक्सिजन सिलेंडर खरेदीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद
– मनपाच्या सर्व दहन घाटांवर एलपीजी किंवा विद्युत शवदाहिनी टप्प्याटप्प्यात बसविण्याचे प्रस्तावित
– अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी पंडीत दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गतत अस्थी अवयव लावण्याकरिता २ कोटी रुपये प्रस्तावित
– ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ कॅम्प, सहली, विविध शिबिरांचे आयोजन व आवश्यक सुविधांसाठी २ लक्ष रुपये राखीव निधी
– स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्ती निमित्त मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी सैनिक पूर्व प्रशिक्षण प्रकल्प राबविण्याचा मानस
– सोनेगाव व गांधीसागर तलावाचे मजबुतीकरण आणि सुशोभीकरण कार्याच्या पहिल्या टप्प्याकरिता ३३ कोटी रुपयांची तरतूद
– मनपा क्षेत्रातील एम्प्रेस मिल परिसरातील १ लाख चौ.फुट जागेवर वंदे मातरम् उद्यान निर्मिती; स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीच्या औचित्याने प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस
– दिघोरी येथील बिरसा नगर भागात २० हजार चौ.फुट जागेत विद्यार्थ्यांकरिता स्केटिंग रिंग व गणिती उद्यान निर्मितीसाठी २४.१० कोटी तरतूद
मनपाच्या उत्पन्नाबाबत व उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत
मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी संबंधित विभागांना उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने आवश्यक निर्देश देउन या आर्थिक वर्षात प्राप्त करावयाच्या उद्दिष्टाची माहिती यावेळी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी दिली.
अ.क्र. तपशीलवार वर्णन प्रस्तावित उत्पन्न (रू.कोटीमध्ये)
१ स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) पासून येणारी प्रलंबित आय ४.००
२ मालमत्ता कर २८९.४३
३ महसुली अनुदान आय १४१८.८०
४ जलप्रदाय २०१.०२
५ बाजार ०.५१
६ स्थावर ४.९५
७ अग्निशमन १.७२
८ नगररचना ८६.१९
९ आरोग्य ८.८४
१० लोककर्म ०.८१
११ लोककर्म बी.ओ.टी. प्रकल्प ०.०१
१२ विद्युत १२.५०
१३ हॉटमिक्स प्लांट ५.०१
१४ इतर विभागांची करेत्तर आय २९.१८
१५ इतर विभागांची इतर आय ४७.६८
१६ भांडवली अनुदान १८७.५५
१७ भांडवली कर्ज ५०.००
१८ निक्षेप व ठेवी ११५.८०
१९ अग्रीम आय १२.०७
एकूण उत्पन्न २४७६.०७



0 टिप्पण्या