मनपातर्फे दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य व ट्रायसिकल प्रदान
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणीवेतून मनपाचे ऋणनिर्देशन
नागपूर, ता. २७ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेतर्फे समाजविकास विभागांतर्गत महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते ५ दिव्यांगांना स्वयं रोजगारासाठी प्रत्येकी १ लाख ९० हजार रुपयांचे धनादेश तसेच ९ दिव्यांग बांधवांना ट्रायसिकलच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.
मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, दिव्यांग प्रतिनिधी तथा नगरसेवक दिनेश यादव, उपायुक्त राजेश भगत, समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर, राष्ट्रीय स्वाभिमान परिषदेचे मुन्ना महाजन व भगवानदास राठी आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटकाळामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर अन्य सुविधांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या कार्याला कुठलीही तुलना नाही. आपल्या नागपूर शहरातील नागरिकांसह संपूर्ण विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात जिथे मदतीची आवश्यकता आहे तिथे मदत पोहोचविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अहोरात्र कार्य केले आहे. नेहमी समाजकार्यासाठी अग्रेसर राहणा-या नितीन गडकरी यांनी केलेल्या कार्याप्रती ऋण व्यक्त करणे हे नागपूर महानगरपालिकेची जबाबदारी आहे. या ऋणानुबंधातून सामाजिक कार्याद्वारे ना.नितीन गडकरी यांना मनपाद्वारे शुभेच्छा देण्यात येत आहे, अशी भावना यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली.
दिव्यांग बांधवांसाठी मनपामध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनेंतर्गत ५ दिव्यांग बांधव आणि भगीनींच्या सक्षमीकरणासाठी, त्यांना स्वयंरोजगारास प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकी १ लाख ९० रुपये असे एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. तर अस्थिव्यंग असलेल्या दिव्यांग बांधवांना आवागमनामध्ये सुलभता प्रदान व्हावी याउद्देशाने ९ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी ४० हजार रुपये किंमतीच्या ट्रायसिकल प्रदान करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे, नागपूर बाहेरील ट्रायसिकल कंपनी टाळून शहरात तयार झालेल्याच ट्रायसिकल देण्यात आलेल्या आहेत. भविष्यामध्ये ट्रायसिकलमध्ये बिघाड झाल्यास दिव्यांग बांधवांना त्याच्या दुरूस्तीसाठी त्रास होउ नये व आपल्या शहरातील रोजगाला प्रोत्साहन मिळावे, याउद्देशाने शहरातील ट्रायसिकलला प्राधान्य देण्यात आले आहे, असेही यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
प्रारंभी उपायुक्त राजेश भगत यांनी नागपूर महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाद्वारे दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. कर्णबधिर बांधवांची आवश्यक शस्त्रक्रीया ते खेळाडूंना आवश्यक मदत करण्यास नागपूर महानगपालिकेद्वारे प्राधान्य देण्यात येत आहे. शहरातील दिव्यांग बांधवांनी मनपाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दिव्यागांचे वतीने नगरसेवक श्री. दिनेश यादव यांनी महापौरांचे आभार मानले. महापौरांच्या हस्ते स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी १ लाख ९० हजार रुपये अर्थसहाय्य अश्विन विलास बन्सोड, सुधाकर श्रीपत बिल्लोर, दिलीप परसराम नेवारे, कमलचंद रुपचंद पदमावत, जिज्ञासा योगेश्वर चवलढाल यांना देण्यात आले. तसेच ट्रायसिकल नारायण वासुदेव निंबुळकर, श्रीकृष्णराव मकरंद मोहाणे, नथ्युलाल मोतीलाल उईके, फैयान उद्दीन फैयाज उद्दीन, प्रीतम संजय राऊत, सुरज श्याम करवाडे, देवेंद्र बुबन, विष्णु बीरसींग घोडाम, शैलेंद्र लक्ष्मणप्रसाद तिवारी यांना देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संचालन एमआयएस व्यवस्थापक नूतन मोरे यांनी केले. यावेळी समाजविकास विभागाचे चंद्रशेखर पाचोडे, विकास बागडे, प्रमोद खोब्रागडे आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या