बाजारात फिरून महापौरांनी केली जनजागृती
उत्स्फूर्त बंद पाळल्याबद्दल नागरिकांचे मानले आभार
नागपूर, ता. ६ : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले होते.
या आदेशाचे पालन करीत नागपुरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. नागरिकांनीही घरीच राहणे पसंत केले. याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागरिकांचे आभार मानले. बाजार परिसरात फिरून त्यांनी कोरोना नियमासंदर्भात जनजागृतीही केली.
शनिवार आणि रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापौर दयाशंकर तिवारी यांनी दही बाजार, इतवारी, बर्डी परिसरातील बाजारांचा दौरा केला.
दौऱ्याच्या वेळी सातरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, सहायक आयुक्त विजय हुमने, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
या दौऱ्यात अनेक भाजी, फळविक्रेते मास्क परिधान केलेले नव्हते. त्यांना महापौरांनी मास्क परिधान करण्याचे आवाहन केले. यानंतर पुन्हा मास्कविना आढळले तर दंड ठोठावण्याचे निर्देश सोबत असलेल्या उपद्रव शोध पथकाला त्यांनी दिले. जे मास्कविना आढळतात अशा विक्रेत्यांना प्रथम समज द्या, जनजागृती करा, त्यानंतरही ते ऐकत नसेल तर दंड आकारा, असे निर्देश त्यांनी दिले.
महापौरांनी मानले आभार
शनिवार आणि रविवारी बाजारात प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याचा संभव असतो. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा प्रशासनाने दोन दिवस बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची नागपुरातील बहुतांश सर्वच व्यापारी, नागरिकांनी अंमलबजावणी केली. त्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्व व्यापारी, नागरिकांचे आभार मानले.
प्रतिनिधी:-जयंत डोंगरे,कामठी (नागपूर)


0 टिप्पण्या