राहुल गांधींच्या सातत्यपूर्ण मागणीमुळेच मोदी सरकारला जातीनिहाय जनगणना जाहीर करावी लागली : डॉ. सिरिवेल्ला प्रसाद
टिळक भवन येथे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील ओबीसी कार्यकर्त्यांचा भव्य प्रशिक्षण मेळावा; ‘मंडल विरुद्ध मनुवाद’ पुस्तकाचे प्रकाशन.
मुंबई, दि. ४ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने काँग्रेस मुख्यालय टिळक भवन, मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांतून आलेल्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त वातावरणात पार पडलेल्या या शिबिरात सामाजिक न्याय, संविधानिक अधिकार, आरक्षण, जातीनिहाय जनगणना आणि ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या प्रश्नांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
याच कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. यशपाल भिंगे लिखित ‘मंडल विरुद्ध मनुवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते श्री. विजय वडेट्टीवार, AICC सचिव सौ. रेहाना चिश्ती, खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, काँग्रेस प्रवक्ते श्री. हनुमंत पवार, तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेले ओबीसी विभागाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी जातिव्यवस्थेवर टीका करताना सांगितले की, जातिव्यवस्थेने समाजामध्ये विविध घटकांमध्ये भेदभाव आणि संघर्ष निर्माण केला. या उतरंडीच्या व्यवस्थेमध्ये ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक दुय्यम स्थान देण्यात आले असून मनुस्मृतीवर आधारित विचारसरणीने ओबीसी समाजाचे शोषण केले.
“जातिव्यवस्थेविरोधातील संघर्ष जुना आहे; मात्र आता या संघर्षाचे स्वरूप बदलण्याची गरज आहे. जननायक राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी अत्यंत ठामपणे मांडली. प्रत्येक समाजाची लोकसंख्या किती आहे, हे समजले पाहिजे आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. राहुल गांधी यांनी ही मागणी सातत्याने लावून धरल्यामुळे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातीनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय जाहीर करावा लागला,” असे डॉ. प्रसाद यांनी सांगितले.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य करताना सांगितले की, विविध समाजघटक आज आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढविणे आणि जातीनिहाय जनगणना करणे हाच आरक्षणाच्या प्रश्नावरील खरा मार्ग आहे.
“भाजप सरकार मात्र हे निर्णय घेण्यास तयार नाही. विविध समाज आरक्षणासाठी संघर्ष करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम करीत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायम ठेवले असते, तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती,” असे सपकाळ यांनी म्हटले.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते श्री. विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. “राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर निर्णायक बनला,” असे वडेट्टीवार म्हणाले.
मंडल आयोगाने ओबीसी समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये २७ टक्के आरक्षणाची शिफारस केली होती. मात्र मनुवादी विचारसरणीच्या शक्तींनी मंडलच्या चळवळीविषयी ओबीसी समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम केले. जातीय द्वेष आणि विभाजनाच्या विचारसरणीचा पराभव करण्यासाठी समता आणि सामाजिक न्यायाची विचारधारा मजबूत करणे आवश्यक आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
कार्यक्रमात ‘मंडल विरुद्ध मनुवाद’ या पुस्तकाचे लेखक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांनी मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांच्या ऐतिहासिक योगदानाचा उल्लेख केला.
“ओबीसी समाजाला स्वतंत्र सामाजिक व राजकीय ओळख देण्यामध्ये बी. पी. मंडल यांचे योगदान ऐतिहासिक आहे. त्यांनी देशभरातील सामाजिक वास्तवाचा अभ्यास करून व्यापक माहिती व आकडेवारीच्या आधारे ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणाची शिफारस केली,” असे डॉ. भिंगे यांनी सांगितले.
या प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून सहभागी झालेल्या ओबीसी कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी, राजकीय व सामाजिक जागृती, संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय, आरक्षण, जातीनिहाय जनगणना आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
राज्याच्या कानाकोपऱ्यातील ओबीसी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भव्य उपस्थितीमुळे हे प्रशिक्षण शिबिर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या संघटनात्मक शक्तीचे दर्शन घडविणारे ठरले.
ओबीसी समाजाने केवळ मतदार म्हणून न राहता राजकीय नेतृत्व करणारा समाज बनले पाहिजे आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला अधिक व्यापक व संघटित स्वरूप दिले पाहिजे, असा निर्धार या भव्य प्रशिक्षण शिबिरातून करण्यात आला.
Prashant Pavitre Mukhed Nanded





0 टिप्पण्या