नागपूर-जबलपूर महामार्गावर कांद्री चेकपोस्टचा आतंकवाद!
ट्रकचालकाला बेदम मारहाण; अवैध वसुलीविरोधात चालकांचा ठिय्या आंदोलन, दोन तास वाहतूक विस्कळीत
नागपूर (प्रतिनिधी):
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील रामटेक तालुक्यातील 'कांद्री चेकपोस्ट' पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चेकपोस्टवर काही स्थानिक व्यक्ती व अनधिकृत इसमांकडून ट्रकचालकांना विनाकारण वेठीस धरून सर्रास बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या मनमानी कारभाराविरोधात आणि चालकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ चालकांनी केलेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती.
काय घडली होती घटना?
प्राप्त माहितीनुसार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास इतर ठिकाणचे चेकपोस्ट बंद असताना, 'कांद्री चेकपोस्ट' नेमका कशासाठी सुरू आहे? अशी कायदेशीर विचारणा एका ट्रकचालकाने केली. याचा राग आल्याने चेकपोस्टवरील काही मते आणि गुंडांनी त्या चालकाला हुज्जत घालून दमदाटी केली. एवढेच नव्हे तर, त्याची कॉलर पकडून ट्रकमधून खाली खेचत थेट आरटीओ अधिकाऱ्यांसमोरच त्याला बेदम मारहाण करण्यात आली.
दोन तास महामार्ग ठप्प, प्रवाशांचा मनस्ताप
चेकपोस्टवर चालकावर झालेला हा अमानुष व मनमानी प्रकार पाहून इतर संतप्त ट्रकचालक एकत्र आले. त्यांनी त्वरित आपले ट्रक नागपूर-जबलपूर महामार्गावर उभे करून 'ठिय्या आंदोलन' सुरू केले. या तीव्र आंदोलनामुळे महामार्गावरील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सर्वसामान्य प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
प्रमुख मागण्या:
घटनास्थळी झालेल्या या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर वाहतूकदार व नागरिकांकडून खालील मागण्या रेटल्या जात आहेत:
अवैध वसुली बंद व्हावी: चेकपोस्टच्या नावाखाली सर्वसामान्यांची व ट्रकचालकांची सुरू असलेली बेकायदेशीर व लूटमार तात्काळ थांबवण्यात यावी.
दोषींवर फौजदारी कारवाई: आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालकांना मारहाण करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
तस्करीला चाप बसवावा: मध्य प्रदेशमधून नागपूरच्या दिशेने होत असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूच्या अवैध आयातीवर व तस्करीवर कडक प्रतिबंध लावण्यात यावा.
उच्चस्तरीय चौकशी: या संपूर्ण प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून महामार्गावर मालवाहतूकदारांना सुरक्षित व पारदर्शक वातावरण मिळवून देण्यात यावे.


0 टिप्पण्या