Advertisement

२०२६च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी


२०२६च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी


खासदार श्यामकुमार बर्वे यांनी संसदेत ओबीसींची भूमिका मांडावी; श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेचे निवेदन


कन्हान : - भारत सरकारच्या २०२६च्या जनगणनेत इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाची स्वतंत्रपणे गणना करून जनगणना पत्रिकेत ‘OBC’साठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, अशी मागणी श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेच्या कन्हान शहर शाखेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार (बबलू) बर्वे यांना बुधवारी (ता. १६) देण्यात आले.


श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा संस्थापक अनिल विठोबा बजाईत यांच्या नेतृत्वात युवा आघाडी विदर्भ महासचिव तथा कन्हान शहर अध्यक्ष सुनील सरोदे आणि नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख सूर्यभान चकोले यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले. ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती याबाबत अधिकृत आणि सर्वंकष आकडेवारी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


देशातील विविध समाजघटकांसाठी शिक्षण, रोजगार, आरक्षण, आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणाच्या योजना आखताना अधिकृत लोकसंख्यात्मक व सामाजिक-आर्थिक आकडेवारी महत्त्वाची ठरते. मात्र ओबीसी समाजाची स्वतंत्र व सर्वंकष अधिकृत जनगणना झालेली नसल्याने त्यांच्या वास्तविक लोकसंख्येबाबत तसेच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत अचूक आकडेवारी उपलब्ध नसल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला आहे. परिणामी ओबीसी समाजासाठी आखण्यात येणाऱ्या धोरणांच्या नियोजनावर आणि अंमलबजावणीवर परिणाम होऊ शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे.


त्यामुळे २०२६च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद करावी आणि जनगणना पत्रिकेत ‘OBC’साठी स्वतंत्र कॉलम ठेवावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. ही मागणी कोणत्याही एका राजकीय पक्षाशी संबंधित नसून सामाजिक न्याय, समान संधी आणि अचूक लोकसंख्यात्मक आकडेवारीशी निगडित राष्ट्रीय महत्त्वाचा विषय असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या नात्याने खासदार बर्वे यांनी हा प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडावा, केंद्र सरकारचे लक्ष वेधावे आणि ओबीसी जनगणनेसह स्वतंत्र कॉलमसाठी ठाम भूमिका मांडावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.


यावेळी कन्हान शहर सचिव ऋषभ बावनकर, सुनिता मानकर, सुषमा मस्के, भगवान लांजेवार, मनोहर कोल्हे, संजय चोपकर, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या