भक्तिमय वातावरणात कन्हान पोलीस ठाण्यातील गणरायाला भावपूर्ण निरोप
ढोल-ताशांच्या गजरात व गुलालाची उधळण करत काली घाटावर विधिवत गणेश विसर्जन
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन येथे गणेश चतुर्थीनिमित्त मोठ्या भक्तिभावाने विराजमान करण्यात आलेल्या गणरायाला सोमवार (दि. २८) सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. काली घाटावर कन्हान नदीपात्रात विधिवत पूजा-अर्चना करून गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
सोमवार (दि.१४) सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक गौडा आणि पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रोच्चार व विधिवत पूजा-अर्चना करून गणरायाची स्थापना करण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या कालावधीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दररोज सकाळ-सायंकाळ भक्तिभावाने आरती करण्यात आली.
सोमवारी विसर्जनापूर्वी भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पोलीस स्टेशन परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत गणरायाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
मिरवणूक महामार्गाने मार्गक्रमण करत काली घाटावर पोहोचली. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी व भक्तांनी भावपूर्ण वातावरणात गणरायाची पूजा-अर्चना केली. त्यानंतर कन्हान नदीपात्रात गणपती बाप्पाचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
गणरायाला निरोप देताना उपस्थितांच्या डोळ्यांत भावुकता होती, तर वातावरणात भक्ती आणि श्रद्धेचा सुरेख संगम पाहायला मिळाला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने कन्हान पोलीस स्टेशन परिसर भक्तिमय झाला.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या