Advertisement

आदिशक्ती दुर्गा माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न


आदिशक्ती दुर्गा माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न


भव्य कलश यात्रा, कावड यात्रा व विविध धार्मिक कार्यक्रमांनी शिवनगर परिसर दुमदुमला


कन्हान : - कन्हान शहरातील शिवनगर, गल्ली नं. ५ येथील आदिशक्ती दुर्गा माता मंदिरात आदिशक्ती दुर्गा माता यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आले. रविवार (दि.२३) ते बुधवार (दि.२६) ऑगस्ट २०२६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


सोहळ्याच्या प्रारंभी रविवार, दि.२३ ऑगस्ट रोजी भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजता बी.के.सी.पी. शाळेजवळील हनुमान मंदिर घाट येथून कलश यात्रेला सुरुवात झाली. महामार्गा ने यात्रा गांधी चौक,आंबेडकर चौक, तारसा चौक या सह विविध मार्गाने नगरभ्रमण करत ही यात्रा शिवनगर येथील आदिशक्ती दुर्गा माता मंदिर परिसरात पोहोचली. महिलांनी डोक्यावर कलश धारण करून मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. ‘जय माता दी’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने तसेच ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण शिवनगर परिसर भक्तिमय झाला. कलश यात्रेदरम्यान आकर्षक सजावट, धार्मिक घोष, ढोल-ताशे व भक्तांच्या उत्साहामुळे परिसराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या भव्य कलश यात्रेला महाराष्ट्राचे राज्यमंत्री मा.अॅड. आशिषजी जयस्वाल प्रमुख उपस्थितीने सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.


प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गणेशपूजन, देवी-देवतांचे आवाहन, जलाधिवास, अताधिवास, पुष्पाधिवास, मिष्ठान्नाधिवास, फलाधिवास, वस्त्राधिवास, धान्याधिवास, पूजन व हवन अशा विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले. मंत्रोच्चार, वेदमंत्रांचा निनाद आणि भक्तांच्या जयघोषामुळे मंदिर परिसरात दिवसभर आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.

तसेच श्रावण महिन्याच्या पावन पर्वाचे औचित्य साधून कावड यात्रा व शिवजलाभिषेकासह विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवभक्तांनी पवित्र जल आणून भगवान शिवाचा जलाभिषेक केला. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात काढण्यात आलेल्या धार्मिक यात्रांमुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले.


बुधवार (दि.२६) ऑगस्ट रोजी देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठा व स्थापना, हवन आणि कन्या भोजनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर सायंकाळी ७ वाजल्यापासून मंदिर परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. धार्मिक सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाचे प्रमुख सहयोगकर्ते महाराष्ट्राचे राज्यमंत्री मा.अॅड. आशिष जयस्वाल यांच्या सह आदि गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ समाजसेवक वर्धराजजी पिल्ले यांच्या पुढाकाराने करण्यात आले.


चार दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे शिवनगर परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. माता दुर्गेच्या जयघोषाने आणि धार्मिक मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आदिशक्ती दुर्गा माता मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता श्रद्धा, भक्ती, सामाजिक एकोपा आणि सामूहिक सहभागाचा सुंदर संगम ठरला. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेत माता दुर्गेचे दर्शन व आशीर्वाद घेतला. या सोहळ्याने परिसरातील भाविकांना आध्यात्मिक समाधान व भक्तीमय आनंदाचा अनुभव दिला.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या