कन्हानमध्ये ईद मिलादुन्नबी निमित्त भव्य जुलूस
ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत; शहरात घुमला एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश
कन्हान : - पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या विलादत अर्थात जन्मदिनाच्या स्मरणार्थ साजऱ्या होणाऱ्या पवित्र ईद मिलादुन्नबी निमित्त कन्हान शहरात सुन्नी रजा मस्जिदच्या वतीने भव्य जुलूस काढण्यात आला. उत्साह, श्रद्धा आणि आनंदाच्या वातावरणात निघालेल्या या जुलूसमधून शहरात एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.
जुलूसची सुरुवात सुन्नी रजा मस्जिद येथून झाली. त्यानंतर जुलूस पिपरी मार्गे आंबेडकर चौक येथे पोहोचला. पुढे महामार्गावरून तारसा चौक, सात नंबर नाका, गांधी चौक मार्गे पुन्हा सुन्नी रजा मस्जिद येथे जुलूसचा समारोप करण्यात आला. या जुलूसमध्ये मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच खदान परिसरातूनही ईद मिलादुन्नबीचा जुलूस काढण्यात आला असून तो कन्हान येथील मुख्य जुलूसमध्ये सहभागी झाला.
यावेळी सुन्नी रजा मस्जिदचे इमाम मौलाना इस्माइली, मौलाना जैनुल आबेदीन, अजीमभाई, शकील आलम, अकरम कुरेशी, मोहम्मद शकीब शेख, साहिद रजा, सुलतान रजा, वाहिद भाई, शादाब कुरेशी, नफीस खान, मतीन भाई, सलमान सर, हाजी शेर मोहम्मद, फिरोज खान, हिदायत शेख, नसर खान, ममपी भाई, नगरसेवक सोनू खान, सारीक शेख, अकबर सैय्यद, एहतेशाम सैय्यद, शाकीर शेख, असलम भाई, अब्दुल लतीफ, शेख इस्राईल, खान इस्राईल, सैय्यद वसीम, शाहरुख खान, सिद्दीकी सल्लू, शेख फिरोज मोहम्मद, शकील आलम सिद्दीकी, हाजी सफी साहेब, निशाद शेख, मोहसिन खान, जुबेर खान, अरशिद शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व नागरिक उपस्थित होते.
राजकीय व सामाजिक संघटनांकडून ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत
ईद मिलादुन्नबीच्या जुलूसचे शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटना तसेच नागरिकांच्या वतीने ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी जुलूसवर पुष्पवृष्टी करण्यात आली, तसेच पाणी, फळे, फ्रुटी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. विविध समाजातील नागरिकांनी मुस्लिम समाजातील बांधवांना गळाभेट देत ईद मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे संपूर्ण जुलूसदरम्यान सामाजिक एकता, बंधुभाव आणि सद्भावनेचे वातावरण निर्माण झाले होते. या जुलूसच्या माध्यमातून शहरवासीयांना आपसातील प्रेम, सलोखा आणि भाईचारा कायम ठेवण्याचा संदेश मिळाला. जुलूसच्या समारोपानंतर सुन्नी रजा मस्जिद येथे नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर मुस्लिम समाजातील बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या आणि आनंद साजरा केला.
कन्हान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
जुलूसच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कन्हान पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड आणि पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जुलूसच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था चोखपणे सांभाळली. शांततामय आणि उत्साहपूर्ण वातावरणात ईद मिलादुन्नबीचा पवित्र सण संपन्न झाला. कन्हान शहरातील या भव्य जुलूसच्या माध्यमातून “एकतेतच शक्ती आणि बंधुभावातच समाजाचे खरे वैभव” असा सकारात्मक संदेश देण्यात आला.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या