सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत नागपूर ग्रामीण पोलिसांचा संवाद
पोलीस–जनता समन्वयासाठी हर्ष पोद्दार यांचा पुढाकार; समाजहिताच्या सकारात्मक जनजागृतीवर भर
नागपूर : - सोशल मीडिया हे केवळ माहिती प्रसारित करण्याचे माध्यम नसून, नागरिकांचा विश्वास संपादन करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी समाजहिताला प्राधान्य देत जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा, असे आवाहन नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मा. हर्ष ए. पोद्दार यांनी केले.
पोलीस भवन, नागपूर येथे गुरुवार (दि.२७) ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत चर्चा व संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक अनिल मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. या संवाद सत्रात नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सोशल मीडिया क्षेत्रातील प्रतिनिधींशी विविध सामाजिक व जनहिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. नागपूर ग्रामीण पोलीस दलाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसोबतच विविध उपक्रमांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
सोशल मीडिया माध्यमांचा जबाबदारीने व समाजहितासाठी वापर, पोलीस–जनता समन्वय अधिक मजबूत करणे आणि नागरिकांमध्ये सकारात्मक जनजागृती निर्माण करणे, या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. संवादादरम्यान सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी विविध विषयांवर उपस्थित केलेल्या प्रश्न व शंकांचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सविस्तर निराकरण केले. यावेळी मार्गदर्शन करताना हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, सोशल मीडिया हे केवळ बातम्या किंवा माहिती प्रसारित करण्याचे साधन नसून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासोबतच समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची मोठी ताकद असलेले माध्यम आहे. त्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी अफवा, अपप्रचार अथवा नकारात्मकतेला प्रोत्साहन न देता अधिकृत, विश्वासार्ह आणि समाजोपयोगी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
पोलीस विभागाच्या विविध जनजागृतीपर उपक्रमांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक स्वरूप देण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचा पूल अधिक मजबूत करण्यासाठी सोशल मीडिया सकारात्मक पद्धतीने वापरण्याचा हर्ष पोद्दार यांचा हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे, अशी भावना यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
नागपूर ग्रामीण पोलीस दल आणि सोशल मीडिया क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्यात झालेल्या या थेट संवादामुळे नागरिकांपर्यंत अधिकृत माहिती पोहोचविण्यासोबतच विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागृती निर्माण करण्यास मदत होणार आहे. तसेच पोलीस विभागाच्या समाजोपयोगी उपक्रमांना डिजिटल माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक (गृह) सौ.पूजा गायकवाड, सहायक पोलीस अधीक्षक सावनेर विभागाचे सागर खर्डे, सहायक पोलीस अधीक्षक उमरेड विभागाचे मयंक माधव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक रमेश बरकते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभागाचे पराग पोटे यांच्यासह नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स उपस्थित होते.
हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग आणि सोशल मीडिया क्षेत्रातील प्रतिनिधींमध्ये झालेला हा संवाद पोलीस–जनता संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच समाजहिताच्या सकारात्मक जनजागृतीला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या