कन्हान पोलिसांच्या मनगटावर ‘ओजस्विनी’च्या लेकींच्या प्रेमाची राखी!
कन्हान : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त ओजस्विनी कन्हान शहर अध्यक्षा दीपाली खंगारे यांच्या नेतृत्वाखाली ओजस्विनीच्या तरुण मुलींनी कन्हान पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मॅडम तसेच पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आणि आत्मीयतेने साजरा केला. यावेळी ओजस्विनीच्या मुलींनी कन्हान पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून प्रेम, स्नेह, आदर आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ केले. पोलीस बांधवांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत तरुणींना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
रक्षाबंधन म्हणजे केवळ हातावर बांधला जाणारा धागा नव्हे, तर बहिणीच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणि भावाच्या संरक्षणाच्या विश्वासाला जोडणारे पवित्र नाते आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून ओजस्विनीच्या मुलींनी त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे, आजच्या काळात तरुण पिढी केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित न राहता समाजासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून सकारात्मक संदेश देत आहे, ही निश्चितच कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे. ओजस्विनीच्या या तरुण मुलींनी रक्षाबंधनाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड देत ‘पोलीस आपले रक्षक, आपण त्यांचे कुटुंब’ हा भावनिक संदेश समाजासमोर ठेवला.
तरुणींनी पुढाकार घेऊन राबविलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून, समाजात महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास वाढविणाऱ्या अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज आहे. त्यांच्या या स्तुत्य सामाजिक जाणिवेचे कन्हान शहरातून कौतुक होत आहे. कन्हान पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर राहते. त्यांच्या या सेवाभावी कार्याला सलाम करत ओजस्विनीच्या मुलींनी रक्षाबंधनाच्या माध्यमातून व्यक्त केलेला स्नेह हा खऱ्या अर्थाने ‘राखीच्या धाग्यातून जोडलेला विश्वासाचा बंध’ ठरला.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या