कन्हानच्या गणेश मंदिरात २५१ किलो बुंदीच्या लाडूंचा महाभोग
अनंत चतुर्दशीला श्री गणेश उत्सव सेवा समितीचा धार्मिक सोहळा; महिला समितीच्या भजन-गायनाने मंदिर परिसर भक्तिमय
कन्हान : - कन्हान शहरातील पांधन मार्गावर असलेल्या श्री गणेश मंदिरात श्री गणेश उत्सव सेवा समिती, कन्हानच्या वतीने दहा दिवसीय गणेशोत्सवाचा अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर भक्तिमय वातावरणात समारोप करण्यात आला. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा-अर्चना करून सुरू झालेल्या गणेशोत्सवादरम्यान दररोज भजन-कीर्तन, सकाळ-संध्याकाळ आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला तब्बल २५१ किलो बुंदीच्या लाडूंचा महाभोग अर्पण करण्यात आला. विधिवत पूजा-अर्चना व आरतीनंतर भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मंदिराच्या महिला समितीच्या प्रमुख राधिका झेंडे व मधु जायसवाल यांच्या नेतृत्वाखाली महिला भाविकांनी सुरेल भजनांचे सादरीकरण केले. भक्तिगीतांच्या मधुर स्वरांनी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भजन-गायनात उपस्थित भाविकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानंतर राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाऱ्या गणेशभक्त तसेच नागरिकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक व भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. २५१ किलो लाडूंचा महाभोग अर्पण करून भक्तांनी श्रद्धा व भक्तिभावाने गणरायाला निरोप दिला. दहा दिवस चाललेल्या या गणेशोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी पांधन मार्गावरील गणेश मंदिर परिसर दिवसभर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने गजबजून गेला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे अध्यक्ष कॅप्टन सतीश बेलसरे, सचिव शैलेश झेंडे, राजू राठी, भरत सावळे, प्रदीप जयस्वाल, नत्थू चरडे यांच्यासह समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष सहकार्य केले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या