निमखेडा येथे २० वी आष्टे-डू मर्दानी आखाडा स्पर्धा उत्साहात संपन्न
नागपूर जिल्ह्यातील १३ आखाड्यांचा सहभाग; १८० खेळाडूंनी सादर केले मर्दानी कलेचे उत्कृष्ट कौशल्य
कन्हान : शिवकालीन परंपरेतील मर्दानी खेळांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने परमात्मा एक दांडपट्टा मर्दानी आखाडा, निमखेडा यांच्या वतीने २० वी आष्टे-डू मर्दानी आखाडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वरूपात संपन्न झाली. या स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील १३ आखाड्यांमधील तब्बल १८० खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या मर्दानी कला व शौर्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
स्पर्धेचे उद्घाटन व शुभारंभ महागुरू राजेश तलमले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नागपूर जिल्हा ग्रामीण आष्टे-डू मर्दानी आखाड्याचे सचिव राजू बाबा कवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच मैदानाचे पूजन केल्यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती पारशिवनीचे उपसभापती सुभाष तडस, निमखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कलावतीताई सुभाष तडस, उपसरपंच देवाजी डोंगरे, सुरेंद्रजी बुधे, माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटजी कारामोरे, सतीशजी वाडीभस्मे, धनश्री मॅडम, लहानुजी वकलकर, कवळुजी वकलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत शिवकला, मर्दानी कला, दांडपट्टा, भाला आदी विविध पारंपरिक खेळांचे थरारक प्रदर्शन करण्यात आले. खेळाडूंनी शिस्त, धाडस, आत्मविश्वास आणि जोशपूर्ण कौशल्याचे दर्शन घडवत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेत विविध आखाड्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. परमात्मा एक दांडपट्टा मर्दानी आखाडा, निमखेडा येथील खेळाडूंनी १२ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्य पदके मिळवली. बिरसा मुंडा आखाडा, देवलापार येथील खेळाडूंनी तब्बल २२ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदकांवर आपले नाव कोरले. छावा क्रीडा क्लबच्या खेळाडूंनी ९ सुवर्ण, ६ रौप्य व कांस्य पदकांची कमाई करत दमदार प्रदर्शन केले. तर शिवशंभू आखाडा, कांद्रीच्या खेळाडूंनी १२ सुवर्ण, १४ रौप्य आणि ४ कांस्य पदके मिळवत शानदार यश संपादन केले.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी भव्य पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या खेळाडूंना तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या आखाडा संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे व पदके प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना खेळाडूंच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजेते खेळाडू व आखाड्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. शिवकालीन मर्दानी खेळ हे केवळ खेळ नसून आपल्या गौरवशाली परंपरा, शौर्य आणि संस्कृतीची ओळख आहेत. या पारंपरिक खेळांची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच युवकांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
वस्ताद मोहन वकलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे निमखेडा परिसरासह आसपासच्या भागात मर्दानी खेळांबद्दल मोठा उत्साह व आकर्षण निर्माण झाल्याचे दिसून आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परमात्मा एक दांडपट्टा मर्दानी आखाडा, निमखेडा येथील पदाधिकारी, वस्ताद, खेळाडू आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या