Advertisement

शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू


शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू


मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट ; खोपडी शिवारात दुर्दैवी घटना


कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा खोपडी, येथील शेतात मजुरीच्या कामासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी शेताच्या बांधावर आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुलोचना देवरावजी ठाकरे (वय ६५) रा. खोपडी असे मृत महिलेचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटादरम्यान वीज पडल्याने महिलेचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


प्राप्त माहितीनुसार, सुलोचना ठाकरे शुक्रवार (दि.१८) सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता च्या दरम्यान आपल्या मामी रेखाबाई लक्ष्मण वराडे, उषाबाई रामेश्वर वराडे आणि चंद्रबाई रघुनाथ वराडे यांच्यासोबत खोपडी शिवारातील शेतात मजुरीच्या कामासाठी गेल्या होत्या. संबंधित शेत हे लक्ष्मण वराडे यांनी ठेक्याने केले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, दुपारी सुलोचना घरी परतल्या नसताना सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी आकाशात जोरदार विजांचा कडकडाट सुरू होता. रात्रीपर्यंत त्या घरी न परतल्याने त्या नातेवाईकांकडे गेल्या असाव्यात, असे कुटुंबीयांना वाटले.


शनिवार (दि.१९) सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता च्या दरम्यान विकास वराडे यांनी प्रवीण ठाकरे यांना फोन करून सुलोचना घरी आहेत का, अशी विचारणा केली. त्या घरी नसल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. सकाळी ७ वाजता शेजारील शेतातील बांधीत सुलोचना ठाकरे यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन शवविच्छेदना करिता उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे नेण्यात आले. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी प्रवीण ठाकरे यांचा तक्रारी वरून मर्ग क्र. ३८/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मृत महिलेचा मृत्यू विजेचा धक्का अथवा वीज पडल्यामुळे झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात 

पोलीस हवालदार नरेश बाटबारई करीत आहेत.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या