मनोज जरांगे पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी
भाजप व तेली समाजातर्फे कन्हान पोलिसांना निवेदन;
चंद्रशेखर बावनकुळेंवरील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध
कन्हान : महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल सार्वजनिक व्यासपीठावरून आक्षेपार्ह व मानहानिकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप व तेली समाजाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन कन्हान पोलीस ठाण्याच्या ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांना सादर करण्यात आले. कन्हान भाजपा मंडळाचे महामंत्री सचिन अशोक वासनिक व भाजपा नागपूर ग्रामीण युवा मोर्चाचे उपाध्यक्ष उमेश केशवरावजी कुंभलकर यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजाचे सन्माननीय नेते असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ व खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या विरोधात सार्वजनिक व्यासपीठावरून करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे तेली समाज तसेच भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
सार्वजनिक जीवनात मतभेद व्यक्त करताना भाषेची मर्यादा व लोकशाही मूल्यांचे भान राखणे आवश्यक आहे. मात्र, समाजात तेढ निर्माण होईल किंवा एखाद्या समाजाच्या भावना दुखावतील अशा वक्तव्यांची पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या कथित वक्तव्याची कायदेशीर तपासणी करून संबंधित कलमांनुसार तातडीने गुन्हा दाखल करावा व कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन सादर करतांना दिनेश राऊत, राजेश पोटभरे, राहुल वंजारी, आकाश कापसे, विनोद कोहळे, रोशन किरपान, विकी पारधी, नितेश कांबळे, पवन यादव, शुभम यादव, सुभाष कापसे, सुखांशु मेहरकुळे यांच्यासह भाजप व तेली समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या