शाहीर गजानन वडे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’; भव्य शाहीर कलाकार मेळाव्यात सन्मान
माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांच्या हस्ते सत्कार; समाजप्रबोधनातील योगदानाची दखल
कन्हान : - कांद्री येथील रहिवासी तथा आकाशवाणी कलावंत, भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया महाराष्ट्र संघटन प्रमुख शाहीर गजानन वडे यांना त्यांच्या कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नुकताच ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
भव्य शाहीर कलाकार मेळाव्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, शिवसेना नेते राधेश्याम हटवार, शाहीर राजेंद्र बावनकुळे आणि नितीन पाटील यांच्या हस्ते शाहीर गजानन वडे यांचा सत्कार करण्यात आला. शाहीर गजानन वडे हे उत्कृष्ट भजन गायन व पोवाड्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करीत आहेत. भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडियाच्या महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध शाहीर कलाकार मेळाव्यांच्या आयोजनात ते तन-मन-धनाने योगदान देत असून, प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
कला क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदान, समाजप्रबोधनाचे कार्य तसेच शाहीर कलाकारांच्या विविध उपक्रमांना दिलेल्या सहकार्याची दखल घेत कार्यकारिणी मंडळाने एकमताने गजानन वडे यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शाहीर गजानन वडे यांनी उपस्थित सर्व शाहीर कलाकार, मान्यवर पाहुणे आणि आयोजकांचे आभार मानले. हा सन्मान भविष्यातही कला व समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या