Advertisement

चार वर्षांतच कन्हान नदी पुलाची दुरवस्था, महामार्गावर खड्डे ; बाहेर आलेल्या सळाख्यांनी मृत्यूचा सापळा


चार वर्षांतच कन्हान नदी पुलाची दुरवस्था, महामार्गावर खड्डे ; बाहेर आलेल्या सळाख्यांनी मृत्यूचा सापळा


वारंवार डागडुजी, तरीही समस्या जैसे थे; पीडब्ल्यूडी व संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप


मोठ्या दुर्घटनेपूर्वी प्रशासन जागे होणार का?


कन्हान : - कन्हान नदीवरील नवनिर्मित पुलाची अवस्था अवघ्या चार वर्षांतच चिंताजनक बनली असून, पुलावरील महामार्गावर पुन्हा मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी डांबर व काँक्रीट उखडल्याने लोखंडी सळाख्या बाहेर आल्या असून, या मार्गाचे अक्षरशः 'मृत्यूच्या सापळ्यात' रूपांतर झाले आहे. हजारो वाहनांची रोजची वर्दळ असलेल्या या पुलावर मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला असून, नागरिक व वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


कन्हान नदी नवनिर्मित पुलाचे उद्घाटन झाल्यापासून अनेक वेळा खड्डे पडले. प्रत्येक वेळी संबंधित यंत्रणेकडून केवळ तात्पुरते खड्डे बुजवून प्रश्न दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कायमस्वरूपी व दर्जेदार दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी काही महिन्यांतच पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होत असून, संबंधित विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


१ सप्टेंबर २०२२ रोजी लोकार्पण झालेल्या या पुलावर उद्घाटनानंतर अवघ्या एका वर्षातच रस्ता व स्पॅन गॅपची अनेकदा दुरुस्ती करावी लागली होती. त्यानंतरही वारंवार खड्डे पडत असल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दररोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या पुलावरून एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्स, ट्रक, कंटेनर, चारचाकी आणि दुचाकींसह हजारो वाहने धावतात. मात्र बाहेर आलेल्या लोखंडी सळाख्या आणि खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत असून, अपघातांची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे.

अलीकडेच खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात इलेक्ट्रिक कार व दुचाकीची धडक होऊन एका युवकाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना घडल्याने या मार्गावरील धोक्याची तीव्रता पुन्हा अधोरेखित झाली आहे. नागरिकांचा सवाल आहे की, एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे .


स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, वारंवार होणाऱ्या डागडुजीवर लाखो रुपयांचा खर्च होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी, पीडब्ल्यूडी आणि महामार्गाशी निगडित यंत्रणांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन उच्चस्तरीय तांत्रिक तपासणी करावी, दोषी आढळल्यास आवश्यक कारवाई करावी आणि पुलावरील खड्डे व बाहेर आलेल्या सळाख्यांची दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या