बर्फ कारखानदाराकडून ५० हजारांची खंडणी मागितली ; चाकूचा धाक दाखवून १० हजार उकळले
वाघधरेवाडी परिसरातील धक्कादायक घटना ; दोन्ही आरोपी कन्हान पोलिसांच्या ताब्यात
कन्हान : कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघधरेवाडी परिसरात बर्फ कारखान्यात घुसून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि चाकूचा धाक दाखवून १० हजार रुपये ऑनलाइन उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, कल्पेश ईश्वर आहिर (वय ३३, रा. रामनगर, कन्हान) हे त्यांच्या भावाच्या नावावर असलेल्या तुळजा भवानी बर्फ फॅक्टरीत बर्फ वितरणाचे काम करतात. सोमवार, (दि.१७) ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास कल्पेश हे कारखान्यात उपस्थित असताना निलेश उर्फ मोगली पात्रे हा एका साथीदारासह कारखान्यात आला.
तक्रारीनुसार, आरोपींनी कल्पेश यांच्याकडे तातडीने ५० हजार रुपये देण्याची मागणी केली. तसेच दिवाळीत मोठी रक्कम आणि दर महिन्याला ३० हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. कल्पेश यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर निलेश पात्रे याने कमरेतून चाकू काढून त्यांच्या गळ्याला लावल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी मागितलेले पैसे दिले नाहीत किंवा पोलिसांत तक्रार केली, तर कल्पेश, त्यांचे भाऊ व वडिलांना जीवे मारण्याची तसेच पत्नीला त्यांच्या समोरून उचलून नेण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. चाकूचा धाक दाखविल्यानंतर कल्पेश यांनी आपल्या मोबाईलवरून आरोपीच्या मोबाईल स्कॅनरवर १० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या व्यवहाराचा UTR क्रमांक 612933649494 असून, व्यवहारामध्ये निलेश विश्वेश्वर पात्रे असे नाव दिसून आल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याशिवाय आरोपीने ‘पोलिसांना घाबरत नाही’ असे म्हणत दहशत निर्माण केली तसेच बारमधून बिअरची बाटली आणण्यास कल्पेश यांना भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे वाघधरेवाडी व कन्हान परिसरात खळबळ उडाली असून, खंडणीसाठी चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
या प्रकरणी कन्हान पोलीसांनी कल्पेश आहिर यांच्या तक्रारीवरून निलेश उर्फ मोगली पात्रे व त्याचा साथीदार बॉबी लहानुजी पात्रे, दोन्ही रा. एम.जी. नगर, कन्हान यांच्याविरुद्ध कन्हान पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या