कांद्रीच्या सुखदेव कॉलनीत घरफोडी; चांदी-सोन्यासह ९८ हजारांचा ऐवज चोरीला
कन्हान : - कांद्री येथील सुखदेव कॉलनी परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने व चांदीच्या वस्तूंसह १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट चोरीला गेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सौ. लता गणेश नगरकर (वय ५२, रा. सुखदेव कॉलोनी, कांद्री, कन्हान) या सध्या आपल्या मुलासोबत मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील वैढण येथे राहत असून, अधूनमधून कांद्री येथील घरी येत असतात. त्यांच्या कांद्री येथील घराची देखरेख अरविंद गोकुल प्रसाद (वय ३१, रा. खदान क्र. ३, कन्हान) हे करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. बुधवार (दि.५) ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता तक्रारदार घरातून बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर शुक्रवार (दि.७) ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता घराची देखरेख करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या मुलाला फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली.
यानंतर शनिवार (दि.८) ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता तक्रारदार कांद्री येथील घरी पोहोचल्या असता घराचे मुख्य कुलूप तुटलेले आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूमचेही कुलूप तोडल्याचे दिसून आले. बेडरूममधील लाकडी कपाटातील कपडे अस्ताव्यस्त करण्यात आले होते. गोदरेज कंपनीच्या लॉकरची तपासणी केली असता लॉकरच गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरी गेलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे १ किलो ३४४ ग्रॅम चांदीचे दागिने व विविध चांदीच्या वस्तू, तसेच १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट यांचा समावेश आहे.
चोरी गेलेल्या चांदीच्या वस्तूंची अंदाजे किंमत १९ हजार रुपये, तर सोन्याच्या बिस्किटाची अंदाजे किंमत ७९ हजार रुपये असा एकुण सुमारे ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, चोरी गेलेला लॉकर घराच्या मागील बाजूस असलेल्या WCL रोडलगतच्या नाल्यात तुटलेल्या अवस्थेत व रिकामा मिळून आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.बुधवार (दि.५) ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते शुक्रवार (दि.७) ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने घरात बेकायदेशीर प्रवेश करून चोरी केली . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी लता नगरकर यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या