कन्हानमध्ये ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गहुहिवरा चौक परिसरातील माल धक्क्या जवळ एका ५० वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, (दि.२३) ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरु सुरू केला आहे . मृत व्यक्तीचे नाव संतोष बनवारीलाल गुप्ता (वय ५० वर्षे), रा.हनुमान नगर, कन्हान असे आहे.
प्राप्त माहितीनुसार मृत संतोष गुप्ता हे ट्रक चालक म्हणून काम करीत होते. त्यांना दारू पिण्याची सवय होती. मागील काही दिवसांपासून ते अधिक प्रमाणात दारूचे सेवन करीत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. शनिवार (दि.२२) ऑगस्ट रोजी दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी मोबाईल विकून दारू घेतल्याचेही तक्रारी मध्ये नमूद आहे.
रविवार (दि.२३) ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ५ वाजता संतोष गुप्ता घरातून बाहेर पडले. त्यानंतर गहुहिवरा चौकाजवळील मालधक्क्याच्या परिसरात निंबाच्या झाडाला चादरीने (लाल-निळ्या रंगाचे ब्लँकेट) गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन त्यांना उपचारासाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. मृतकाच्या कुटुंबीयांनी या मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारी मध्ये नमूद केले आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी मर्ग दाखल करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या