Advertisement

कन्हानमध्ये गोवंश तस्करीचा पर्दाफाश ; १९ गोवंशांची सुटका


कन्हानमध्ये गोवंश तस्करीचा पर्दाफाश ; १९ गोवंशांची सुटका


२८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; ट्रक मालकासह दोघे ताब्यात


स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची धडक कारवाई


कन्हान : कत्तलीच्या उद्देशाने गोवंशांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने पर्दाफाश केला. कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारसा रोडवर नाकाबंदी करून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने १९ गोवंशांची सुटका केली. या कारवाईत ट्रक, कार, मोबाईल व गोवंश असा एकूण २८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ट्रक मालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर ट्रक चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला.


प्राप्त माहितीनुसार, रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान परिसरात अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मौदा-गुमथळा परिसरातून कन्हानमार्गे नागपूरच्या दिशेने लाल रंगाच्या टाटा कंपनीच्या सहा चाकी ट्रकमधून गोवंशांची अवैधरित्या वाहतूक करण्यात येत आहे. संबंधित ट्रकचा क्रमांक MH-40-CT-7893 असून, ट्रकचा डाला काळ्या ताडपत्रीने झाकण्यात आला होता.

या माहितीच्या आधारे पथकाने कन्हान ते तारसा मार्गावरील पुलाजवळ नाकाबंदी केली. काही वेळात संशयित ट्रक येताना दिसताच पथकाने हात दाखवून वाहन थांबविण्याचा इशारा केला. चालकाने काही अंतरावर ट्रक थांबवून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पथकाने त्याचा पाठलाग केला,मात्र तो हाती लागला नाही.


यानंतर पथकाने ट्रकच्या डाल्यावर बांधलेली काळी ताडपत्री उघडून तपासणी केली असता आत १८ बैल व १ गोरा असे एकूण १९ गोवंश आढळून आले. यामध्ये चार तांबड्या रंगाचे तर १५ पांढऱ्या रंगाचे गोवंश होते. जनावरांना अत्यंत दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात होती. काही जनावरे खाली पडलेल्या अवस्थेत होती. तसेच त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.


तपासादरम्यान ट्रक मालक इरशाद अब्दुल सैय्यद (वय ३५, रा. सईद नगर, रनाळा, कामठी) याचे लोकेशन नागपूर-जबलपूर महामार्गावरील नेरी परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने नेरी येथील पेट्रोल पंप परिसरात शोध घेतला असता तेथे पांढऱ्या रंगाची टोयोटा ग्लान्झा कार क्रमांक MH-40-CQ-1608 आढळून आली. कारमध्ये मोहम्मद रियाज उर्फ बकार अब्दुल रहीम कुरेशी (वय ३९, रा. कामठी) आणि इरशाद अब्दुल सैय्यद हे दोघे आढळून आले. पथकाने इरशाद याच्याकडे ट्रकबाबत चौकशी केली असता त्याने ट्रक हा त्याच्या मालकीचा असल्याचे सांगितले. तसेच ट्रकमध्ये आढळून आलेले गोवंश हे मोहम्मद रियाज उर्फ बकार याच्या मालकीचे असल्याची माहिती पथकाला मिळाली.


या कारवाईत पथकाने 

१९ गोवंश किंमत अंदाजे २ लाख ८० हजार रुपये, टाटा सहा चाकी ट्रक अंदाजे २० लाख रुपये, टोयोटा ग्लान्झा कार अंदाजे ६ लाख रुपये, 

विवो कंपनीचा मोबाईल अंदाजे १० हजार रुपये असा एकूण २८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


सुटका करण्यात आलेल्या १९ गोवंशांच्या सुरक्षा व देखभालीच्या दृष्टीने त्यांना गोविज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार येथे गोशाळेत सुरक्षित ठेवण्यात आले आहे.


या प्रकरणी ट्रक चालक व मालक इरशाद अब्दुल सैय्यद तसेच गोवंशांचा मालक मोहम्मद रियाज उर्फ बकार अब्दुल रहीम कुरेशी यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी सुरक्षा अधिनियम १९९५ तसेच बीएनएसच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार ट्रक चालकाचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलीस करीत आहेत.


ही कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सागर गोमाषे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजकिरण मडावी, पोहवा उमेश फुलबेल, रोहन डाखोरे, किशोर वानखेडे, शैलेश यादव, प्रमोद भोयर, पोशि सम्राट वनपर्ती यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या