टेकाडीतील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात बिबट्याच्या पायाचे ठसे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वनविभागाची घटनास्थळी पाहणी; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन, बिबट्याच्या शोधाकडे लक्ष
कन्हान : - पेंच पाटबंधारे विभागाच्या टेकाडी येथील उपविभागीय कार्यालयाच्या आवारात बिबट्यासदृश हिंस्र प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यालयाच्या आवारातील रेतीच्या ढिगाऱ्यावर पायाचे ठसे स्पष्टपणे दिसून आले. तसेच परिसरात नेहमी झोपणारा कुत्राही गायब असल्याचे निदर्शनास आल्याने बिबट्याचा वावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी (दि.१० ऑगस्ट) सकाळी कार्यालय उघडताना कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हे ठसे आले. याबाबत पेंच पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी गो.बा.चिंतनवार यांनी रामटेक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती देऊन तातडीने परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली.
माहिती मिळताच सायंकाळी सुमारे ५ वाजता वनपरिक्षेत्र रामटेकचे राऊंड ऑफिसर एन.बी.चव्हाण (पटगोवारी) आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने पाहणी केली असता आढळलेले ठसे बिबट्याच्या पदचिन्हांशी मिळतेजुळते असल्याचे निदर्शनास आले.
टेकाडी येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीच्या परिसरात अनेक रिकामी घरे तसेच झाडी-झुडपे असल्याने वन्यप्राण्याला लपण्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने पेंच पाटबंधारे उपविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत वसाहतीची पाहणी केली. यावेळी रिकाम्या घरांचे उघडे दरवाजे बंद करण्यात आले.
या परिसराच्या पश्चिमेला साईबाबा आदिवासी निवासी आश्रमशाळा, दक्षिण व उत्तरेला नागरिकांची वस्ती, तर पूर्वेला कन्हान-मनसर मार्ग व वृंदावन सभागृह आहे. कार्यालयाच्या आवारात साई मंदिर असल्याने येथे नागरिकांची नियमित ये-जा सुरू असते. त्यामुळे बिबट्याचा संभाव्य वावर लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वनविभाग व पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आश्रमशाळेतील शिक्षक-कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी अनावश्यकपणे बाहेर फिरू नये, सतर्क राहावे आणि बिबट्याची कोणतीही हालचाल आढळल्यास तातडीने वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर निश्चित असल्याने वनविभागाकडून पुढील काळात शोधमोहीम व आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या