Advertisement

गावात प्यायला नाही पाणी, तरीही कागदावर विकास पूर्ण; राजुरा ग्रामसभेत ग्रामस्थांचा प्रशासनाला जाब


गावात प्यायला नाही पाणी, तरीही कागदावर विकास पूर्ण; राजुरा ग्रामसभेत ग्रामस्थांचा प्रशासनाला जाब

मुक्रमाबाद/मुखेड (नांदेड) : 

राजुरा (ता. मुखेड) येथील विठ्ठल मंदिर परिसरात नुकतीच ग्रामसभा पार पडली. गावात भीषण पाणीटंचाई असतानाही प्रशासनाकडून मात्र विकासकामे पूर्ण झाल्याचे दाखवले जात असल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभेत प्रश्नांचा भडीमार करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवदास कृष्णाजी राऊत होते, तर मुक्राबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, प्रशासक तथा ग्रामसेवक गायकवाड, उपसरपंच हनुमंतराव झरे, नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटील इंगळे, संदीप पाटील जाधव, श्रीराम पुट्टेवाड, आनंद वाघमारे, चांदोबा वाघमारे, भीमराव वाघमारे, मधुकर पाटील इंगळे, प्रल्हाद पाटील जाधव, दत्ता पाटील जाधव यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाणी प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक

ग्रामसभेच्या सुरुवातीला मागील विकासकामांचा आढावा, तंटामुक्ती अध्यक्षांची निवड आणि विविध विषयांचे वाचन करण्यात आले. मात्र, गावातील गोरगरीब जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारला. उपसरपंचांनी यावर माहिती देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती मोघम असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अधिकाऱ्यांची अरेरावी आणि उडवाउडवीची उत्तरे

ग्रामस्थांनी जेव्हा 'गावाला पुरेसे पाणी कधी मिळणार?' अशी थेट विचारणा केली, तेव्हा संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याने "पाणी भरपूर आहे, तुम्हीच घेत नाही," अशी अरेरावीची भाषा वापरून मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. तसेच गेल्या पाच वर्षांत गावात आलेल्या विकास निधीचा हिशोब मागितला असता, समाधानकारक उत्तर न देता विषय दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

देशाच्या स्वातंत्र्याला अनेक दशके उलटूनही जर राजुरा गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असेल, तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन घेणार का? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केला.


प्रतिनिधी राजाराम वाघमारे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या