किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला ; तीन आरोपी अटक
तारसा रोडवर रक्तरंजित थरार; कन्हान पोलीसात गुन्हा दाखल
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोडवरील गॅलेक्सी बारसमोर किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कन्हान पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या हल्ल्यात निलेश उर्फ नितेश मुलचंद लोंढे (वय २७, रा. सत्रापूर, कन्हान) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वीरू बिरजू हातागडे (वय २३, रा. वाघधरे वाडी, एम.जी. नगर, कन्हान) हे आपल्या मित्र निलेश लोंढे यांच्यासह दुचाकीने कन्हानकडे येत असताना, रविवारी (दि.२ ऑगस्ट) रात्री सुमारे ९.३० ते ९.४५ वाजताच्या दरम्यान तारसा रोडवरील गॅलेक्सी बारसमोर एक ट्रक आडवा उभा असल्याने किरकोळ वाद झाला. वाद वाढल्यानंतर ट्रकचालक अश्विन उर्फ गुड्डू वाघमारे याने शिवीगाळ केली. त्यानंतर त्याचे साथीदार अभी सोमकुंवर व सम्यक परिपगार घटनास्थळी आले. आरोपानुसार, सम्यक परिपगार याने धारदार चाकूने निलेश यांच्या पोटावर वार केला. त्यानंतर अश्विन उर्फ गुड्डू वाघमारे याने तोच चाकू घेऊन निलेश यांच्या कमरेच्या मागील बाजूसही वार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी निलेश यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, कन्हान येथे उपचारासाठी नेले असता तेथील डाॅक्टरांनी प्राथमिक उपचार करुन योग्य उपचारासाठी मेयो हाॅस्पीटल रुग्णालय येथे रेफर केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अश्विन उर्फ गुड्डू वाघमारे, अभी सोमकुंवर आणि सम्यक परिपगार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), २९६ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करून तिन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या