कन्हान नदीत उडी घेतलेल्या १७ वर्षीय तरुणीला जीवनदान
नगरपरिषद अग्निशमन दल, आपदा मित्र व पोलिसांच्या तत्पर बचावकार्याने टळली मोठी दुर्घटना ; उडीमागचे कारण अद्याप अस्पष्ट
कन्हान : - कन्हान नदीवरील पुलावरून १७ वर्षीय तरुणीने नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. नदीच्या वेगवान प्रवाहात वाहत गेलेली तरुणी पुलाच्या खांबाला अडकली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कन्हान - पिपरी नगर परिषदचे अग्निशमन दल, आपदा मित्र, जीवनरक्षक पथक आणि पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तरुणीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
अल्पवयीन मुलगी ही कन्हान शहरातील रहिवासी आहे . मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन तरुणीने कन्हान नदीवरील जुन्या पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्यानंतर ती नदीतील पुलाच्या खांबाला अडकली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
दरम्यान, घटनेची माहिती कन्हान - पिपरी नगर परिषदच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन सेवा विभागाला मिळताच अग्निशमन दलाने विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. लाईफ जॅकेट व आवश्यक बचाव साहित्याच्या मदतीने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात उतरून तरुणीला बुडण्यापासून वाचविले. यासोबतच आपदा मित्र श्याम मस्के, अक्षय चतुर व मनोज बावने तसेच जीवनरक्षक पथकानेही बचावकार्यात सहभाग घेतला.
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्यासह पोलिस पथक तसेच कामठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तरुणीला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
कन्हान-पिपरी नगर परिषद मुख्याधिकारी दिपक घोडके यांच्या नेतृत्वाखाली आणि अग्निशमन पर्यवेक्षक हर्षल दाहाट यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य करण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमुख कर्मचारी आशिष बावनकर व अमित सांभारे, नगरसेवक केतन भिवगडे तसेच इतर कर्मचारी बचावकार्यात सहभागी झाले. अवघ्या काही मिनिटांत सुरू केलेल्या या बचावकार्यातून एका तरुणीला जीवनदान मिळाल्याने अग्निशमन दलाच्या कार्यतत्परतेचे परिसरातून कौतुक होत आहे.
तरुणीने एवढे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास कामठी पोलिस करीत आहेत.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या