Advertisement

कन्हानमध्ये NEET पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा


कन्हानमध्ये NEET पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा


'पेपरफुटी थांबवा, विद्यार्थ्यांना न्याय द्या'च्या घोषणांनी कन्हान दणाणले ; पारदर्शक शिक्षण व्यवस्थेची हजारोंची मागणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी


कन्हान : - देशभरात चर्चेत असलेल्या कथित NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज तसेच शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी कन्हान येथे सर्वपक्षीय भव्य जनआक्रोश व निषेध मोर्चा काढण्यात आला. या शांततापूर्ण मोर्चामध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, विद्यार्थी, युवक, महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि शिक्षण व्यवस्था पारदर्शक व निष्पक्ष व्हावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.



मोर्चाची सुरुवात नाका क्रमांक ७ येथून करण्यात आली. यावेळी कथित NEET पेपरफुटी प्रकरणामुळे मानसिक तणावातून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच आंदोलनादरम्यान कथित मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीला दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर निदर्शकांनी हातात फलक व बॅनर घेऊन नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरून तारसा रोड चौक, शहीद प्रकाश देशमुख चौक, शिवनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पोलीस स्टेशन चौक मार्गे मोर्चा काढला. "पेपरफुटी थांबवा", "विद्यार्थ्यांवर लाठी नव्हे, न्याय द्या", "भ्रष्टाचारमुक्त शिक्षण व्यवस्था लागू करा" आणि "विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा" अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित सभेत विविध नेत्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेबाबत चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच सर्व स्पर्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष व सुरक्षित पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी वक्त्यांनी केली. यावेळी जंतर-मंतर येथे आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांना कथितरित्या ताब्यात घेणे, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज तसेच काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इतर खासदारांशी कथित धक्काबुक्की झाल्याच्या घटनांचाही निषेध करण्यात आला. निदर्शकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.


Protest march in Kanhan against the NEET paper leak and the alleged lathi-charge on students.

या मोर्चामध्ये माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव, माजी मंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे, रिपब्लिकन भीमशक्तीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष सुत्तम मस्के, बीआरएसपीचे शांताराम जलते, कन्हान यूथ फाउंडेशनचे कॅप्टन सतीश बेलसरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या