फुले विचारांचा जागर : डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष ऑनलाईन संवाद सभा उत्साहात संपन्न
नागपूर : - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या समता, शिक्षण, स्त्रीसक्षमीकरण व सामाजिक न्यायाच्या विचारांचा व्यापक प्रसार व्हावा या उद्देशाने अखिल भारतीय माळी महासंघ, जिल्हा नागपूर यांच्या वतीने आयोजित "सावित्रीबाई जोतीराव फुले" मालिकेच्या अनुषंगाने विशेष ऑनलाईन संवाद सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या संवाद सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध कलाकार मा. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी मालिकेच्या निर्मितीमागील प्रेरणा, ऐतिहासिक सत्यता, संशोधन प्रक्रिया तसेच महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे आजच्या समाजातील महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, 'क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका अल्पावधीतच लाखो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी संदेश देणारी ही मालिका काही कारणास्तव प्रसारणातून बंद झाली होती. मात्र, ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला यावी यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले आणि त्यातून 'मराठी वारसा' या YouTube चॅनेलच्या माध्यमातून ही मालिका पुन्हा उपलब्ध झाली. त्यामुळे फुले दांपत्याचे विचार नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. मनोज होले यांनी प्रभावी प्रस्तावना मांडत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यांनी संवाद सभेचा उद्देश स्पष्ट करत फुले विचारांच्या प्रसारासाठी अशा वैचारिक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.
संवाद सभेत अखिल भारतीय माळी महासंघ, जिल्हा नागपूरचे जिल्हाध्यक्ष मनोज गणोरकर, तसेच तरुणभारत चे पत्रकार किशोर वासाडे,ज्योती वासाडे रविंद्र गणोरकर, अमित वासाडे, हेमंत राऊत, निलेश वासाडे, स्वप्नील वासाडे, वसंता फसाटे आणि वर्षा वासाडे यांच्यासह राज्यातील विविध भागांतील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि फुले विचारांचे अभ्यासक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संवादाच्या शेवटी प्रा. डॉ. मनीष मुडे यांनी उपस्थित मान्यवर, मार्गदर्शक, आयोजक आणि सर्व सहभागींचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता फुले दांपत्याच्या विचारांचा समाजात अधिक व्यापक प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त करून करण्यात आली.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या