Advertisement

नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाच्या तज्ज्ञ समितीवर नियुक्ती ; जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब


 नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाच्या तज्ज्ञ समितीवर नियुक्ती ; जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब


नागपूर : - नागपूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाच्या (National Road Safety Board - NRSB) तज्ज्ञ समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे नागपूर ग्रामीण पोलिस दलाच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून, जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि गौरवास्पद बाब मानली जात आहे.


मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम २१५ (बी) अंतर्गत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. देशातील रस्ता सुरक्षा अधिक प्रभावी, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी केंद्र सरकारला मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या वैधानिक मंडळामार्फत केले जाते.


या मंडळाच्या तज्ज्ञ समितीवर नियुक्त झालेल्या सदस्यांना रस्ता सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, अपघात प्रतिबंधक उपाययोजना, डोंगराळ भागातील रस्त्यांसाठी आवश्यक मानके व मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे, तसेच वाहतूक पोलीस, रुग्णालये, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि शैक्षणिक व संशोधन संस्थांची क्षमता वाढविण्यासाठी धोरणात्मक सूचना देण्याची जबाबदारी असते.


पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी नागपूर ग्रामीण जिल्ह्यात कार्यरत असताना वाहतूक व्यवस्थापन, रस्ता सुरक्षा जनजागृती, अपघात नियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसिंग अधिक प्रभावी करण्यासाठी केलेले उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन त्यांची या महत्त्वाच्या समितीवर निवड झाल्याचे मानले जात आहे.


त्यांच्या या नियुक्तीमुळे नागपूर ग्रामीण पोलिस दलाचा सन्मान देशपातळीवर उंचावला असून, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. हर्ष पोद्दार यांच्या अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा देशातील रस्ता सुरक्षा धोरणे अधिक सक्षम करण्यासाठी निश्चितच मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या