विदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांना निवेदन
शेतकरी विकास मंचातर्फे तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी पारशिवनी यांच्या मार्फत निवेदन सादर
कन्हान : - विदर्भातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधत शेतकरी विकास मंचाच्या वतीने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांना तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी, पारशिवनी यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले.
या निवेदनात राज्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम अद्याप प्राप्त झालेली नसल्याने त्यांना नवीन पीककर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच धान बोनसची रक्कमही अद्याप प्रलंबित असून ती तातडीने वितरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय विदर्भात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून भात, तूर, कापूस आदी पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात आग लागून गव्हाच्या पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चार महिन्यांनंतरही आर्थिक मदत मिळालेली नसल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
राज्य शासनाने पुन्हा १ रुपया पीक विमा योजना सुरू करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, कर्जमाफीची प्रलंबित रक्कम व धान बोनस त्वरित वितरित करावा, तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन पारशिवनीचे तहसीलदार सुरेश वाघचौरे व तालुका कृषी अधिकारी राकेश वसु यांच्या मार्फत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात आले.
Memorandum submitted to the Union Agriculture Minister regarding various pending demands of farmers in Vidarbha.
यावेळी शेतकरी विकास मंचाचे भगवानदास यादव, शांताराम जळते, राजू गुरधे, सुरेश मेश्राम, विशाधर कांबळे, गणेश कांबळे, बळीराम सातपैसे, रामकृष्ण हुड, प्रविण सतदेवे, निर्मला मरकाम, सुनीता कांबळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या