भारतीय सैन्यात निवड झालेल्या ऋषिकेश शेंद्रे यांचा आदिवासी गोवारी फाऊंडेशनतर्फे सत्कार
रामटेक : - रामटेक तालुक्यातील गुडेगाव येथील अत्यंत साध्या व कष्टकरी कुटुंबातील युवक ऋषिकेश शेंद्रे यांची भारतीय सैन्यात निवड झाल्याने परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आदिवासी गोवारी (गोंड गोवारी) फाऊंडेशन, रामटेक यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
ऋषिकेश हे रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे सुखदेव शेंद्रे यांचे सुपुत्र आहेत. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही आई-वडिलांनी मुलाला देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले. घरात कोणीही शासकीय सेवेत नसतानाही ऋषिकेश यांनी अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यात स्थान मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
सत्कार कार्यक्रमाला गोवारी समन्वय व अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कैलाश राऊत, भाजप जिल्हा महामंत्री राहुल किरपान, आदिवासी गोवारी (गोंड गोवारी) फाऊंडेशन रामटेकचे नंदकिशोर कोहळे, चंदू घोनाडे, सुखदेव शेंद्रे, गोंडगोवारी सेवा मंडळाचे कोषाध्यक्ष नामदेव ठाकरे, उपाध्यक्ष अविनाश सोनवाणे, बलधारी नेवारे, भोला वघारे, विलास काळसर्पे, ईश्वर नेवारे, रवींद्र कोहळे, ग्रामसेवक राजेंद्र सलामे, रवींद्र देव्हारे, कृष्णा घुघुसकर, टेकलाल नेवारे, जगदीश शेंद्रे, श्रवण पंचभाये, रुपेश देव्हारे तसेच श्रीराम क्रीडा मंडळाचे विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ऋषिकेश शेंद्रे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या यशातून ग्रामीण भागातील युवकांनी प्रेरणा घेऊन देशसेवा व विविध स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये प्रगती साधावी, असे आवाहन करण्यात आले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या