डाॅ.सतीश मोहोड यांची महाराष्ट्र राज्य जैविक व नैसर्गिक शेतीचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती
नमो नमो भारत संघटनेचा गौरवपूर्ण निर्णय ; शेतकरी सक्षमीकरणासाठी २५ वर्षांच्या कार्याचा सन्मान
नागपूर : - कृषी, शिक्षण, समाजकल्याण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘नमो नमो भारत संघटना’ने महाराष्ट्रातील जैविक व नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ तथा संशोधक डॉ. सतीश नानाजी मोहोड यांची ‘महाराष्ट्र राज्य जैविक व नैसर्गिक शेतीचे ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून नियुक्ती केली आहे. संघटनेच्या केंद्रीय व राज्य कार्यकारिणीच्या सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या २५ वर्षांपासून डॉ.सतीश मोहोड नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती आणि जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. शेतजमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे, मातीचे आरोग्य सुधारणे तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या नैसर्गिक व सेंद्रिय खतांचे यशस्वी प्रयोग विकसित केले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी आपले संशोधन केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले. विविध प्रात्यक्षिके, मार्गदर्शन शिबिरे, प्रशिक्षण कार्यक्रम आणि तांत्रिक सल्ल्याद्वारे हजारो शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीकडे वळविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि शाश्वत शेतीच्या प्रसारासाठी त्यांनी निःस्वार्थ भावनेने दिलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते. डॉ.सतीश मोहोड यांची शैक्षणिक पार्श्वभूमीही तितकीच भक्कम आहे. त्यांनी एम.टेक. (केमिकल इंजिनिअरिंग) आणि एम.बी.ए. (ऑपरेशन मॅनेजमेंट) ही पदवी प्राप्त केली असून, सध्या ते जैविक व सेंद्रिय विषयात पीएच.डी. संशोधन करीत आहेत.
नमो नमो भारत संघटनेने व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, डॉ.सतीश मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील जैविक व नैसर्गिक शेती चळवळीला नवी दिशा व गती मिळेल. त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील लाखो शेतकरी विषमुक्त, पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीकडे वळून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
यावेळी नमो नमो भारत संघटनेच्या वतीने डॉ. सतीश मोहोड यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या भावी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या