नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
नागपूर : - नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून १८ जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
या पोटनिवडणुकीसाठी एकूण ८३६ मतदार पात्र असून त्यामध्ये ४१९ पुरुष आणि ४१७ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्ह्यात एकूण १४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे .
नरखेड, मोवाड, काटोल, कोंढाळी, कळमेश्वर, ब्राम्हणी, मोहपा, सावनेर, खापा, पारशिवनी, कन्हान-पिंपरी, कांद्री, रामटेक, मौदा, कामठी, महादुला, येरखेडा, बीडगाव, गोधणी, बहादुरा, वानाडोंगरी, वाडी, निलडोह, डिंगडोह, हिंगणा, बुटीबोरी, बेसा-पिंपळा, उमरेड, कुही आणि भिवापूर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांसाठी संबंधित तहसील कार्यालये व नगरपरिषद कार्यालयांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या सदस्यांसाठी नागपूर शहर तहसील कार्यालयात मतदान केंद्र राहणार आहे. मतदान प्रक्रिया गुरुवारी, १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत पार पडणार आहे. मतदानानंतर मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, २२ जून रोजी याच ठिकाणी होणार आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली असून सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या