कन्हान मध्ये गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश , दोन तरुणांना अटक
५.८७ किलो गांजा आणि दुचाकी वाहनासह १,९७,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान पोलिसांची मोठी कारवाई
कान्हान: - कन्हान शहरातील जुन्या कन्हान पोलीस ठाण्याच्या इमारती जवळ नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी नाकाबंदी करून गांजा तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला . या कारवाईत पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून ५.८७ किलो गांजा आणि दुचाकी वाहनासह एकु १,९७,६८० किमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे .
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार ( दि.३) एप्रिल रोजी दुपारी २ वाजता च्या दरम्यान पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रवीण हरगुडे , पोहवा हरीश सोनभद्रे , अमित यादव , अनिल यादव , आकाश खोब्रागडे , जीवन विघे , राहुल जाधव यांच्या सह इतर पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करीत होते . यावेळी दोन तरुण त्यांच्या कॉलेजच्या बॅगेत गांजा घेऊन MH 40 AG 4276 क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने कामठीच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती मिळाली . अशी माहिती मिळताच पोलिसांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर नाकाबंदी सुरू केली . या दरम्यान , MH 40 AG 4276 क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने दोन तरुण कामठीच्या दिशेने जातांना दिसले , ज्यांच्या पाठीमागे एक बॅग लटकलेली होती . आरोपी नितेश उर्फ बिट्टू रमेश भुते (वय २८) रा. टेकाडी आणि शैलेश बंसीलाल अकोने (वय ४०) रा.पिपरी कन्हान यांना थांबवुन त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गांजा मिळुन आला . या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून ५.८७ किलो गांजा , एक दुचाकी वाहन , एक मोबाईल फोन सह एकुण१,९७,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . या कारवाईमुळे शहरातील कायदा अधिक कडक झाला असून अमली पदार्थांच्या तस्करांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी उपनिरीक्षक प्रवीण हरगुडे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधारे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या