कन्हान येथुन शिर्डीकडे साई पालखी पदयात्रेचा भव्य शुभारंभ
"जय साई राम"च्या जयघोषाने शहर दुमदुमले ; ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत
कन्हान : - श्री राम नवमी उत्सवा निमित्त श्री साई राम पालखी सोहळा समिती , कन्हान यांच्या वतीने आयोजित साई पालखी पदयात्रेचा गुरुवारी (दि. ५ मार्च) भव्य शुभारंभ करण्यात आला . हजारो साई भक्तांनी भक्ती भावाने सहभाग नोंदवत शिर्डीकडे प्रस्थान केले . “जय साई राम”च्या अखंड जयघोषाने कन्हान परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला .
सकाळी ९ वाजता इंदिरा नगर येथील साई मंदिरात विधीवत अभिषेक, पूजा व आरती करण्यात आली . त्यानंतर पालखी यात्रेस प्रारंभ झाला. अजय ठाकरे , साई ठाकरे , भार्गव ठाकरे , शकुंतला ठाकरे , रूपाली ठाकरे , ज्योती ठाकरे व रिधम वानखेडे यांनी यात्रेकरूंना अन्नदान करून सेवाभाव जोपासला .
Grand inauguration of Sai Palkhi Padayatra from Kanhan to Shirdi
साई नामस्मरणाच्या गजरात पालखीने साई मंदिरातून प्रस्थान केले . तारसा रोड मार्गे भ्रमण करत पालखी संत तुकाराम मंदिरात पोहोचली , जिथे भाविकांनी जगतगुरू संत तुकाराम महाराजांना अभिवादन केले . त्यानंतर गहुहिवरा चौक, शहीद प्रकाश देशमुख चौक, तारसा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व गांधी चौक मार्गे मिरवणूक कन्हान नदी पुलावरून आडापुल येथील साई मंदिरात दाखल झाली . दर्शनानंतर पालखी कामठी – नागपूर मार्गे शिर्डीकडे रवाना झाली . यात्रे दरम्यान विविध ठिकाणी भक्तांनी उत्स्फूर्त स्वागत केले . मीना कळंबे मित्र परिवार , सनातनी धार्मिक संस्था कन्हान तसेच अनेक सामाजिक संस्थांनी फुलांची उधळण , फळ व शरबत वाटप करून साईभक्तांचे जल्लोषात स्वागत केले .
ही पदयात्रा २१ दिवस विविध गावांतून भ्रमण करीत बुधवार, २५ मार्च रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे मुक्काम करणार आहे . गुरुवार, २६ मार्च रोजी नीमगाव येथील श्री साई पालखी निवारा येथून भव्य मिरवणूक निघून खंडोबा मंदिर मार्गे शिर्डीतील साई समाधी मंदिरात पोहोचेल . श्री राम जयंतीनिमित्त शिर्डीत विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर पालखी कन्हानकडे परतीचा प्रवास सुरू करणार आहे . भक्ती , श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा संगम ठरलेली ही पालखी पदयात्रा कन्हानकरांसाठी आध्यात्मिक उत्सवाचे पर्व ठरत आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या