Advertisement

भव्य मंगल कलश शोभायात्रेने श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचा शुभारंभ


भव्य मंगल कलश शोभायात्रेने श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचा शुभारंभ


कन्हान : - कन्हान शहरातील पांधन रोडवरील गणेश मंदिरात श्री गणेश उत्सव समितीच्या वतीने तिळ संकट चतुर्थी महोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचा शुभारंभ रविवारी भव्य मंगल कलश शोभायात्रेने उत्साहात करण्यात आला . हा सप्ताह रविवार (दि. २८ डिसेंबर) ते शनिवार (दि. ३ जानेवारी) दरम्यान होत असून भागवताचार्य अनुराग कृष्णजी शास्त्री यांच्या भागवत प्रवचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .


रविवारी सकाळी गणेश मंदिरातून महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेऊन शोभायात्रा काढली . हनुमानाच्या वेशभूषेत हनुमान सोनवाने यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले . राष्ट्रीय महामार्गावरून सुरू झालेली ही शोभायात्रा गांधी चौक , आंबेडकर चौक , तारसा चौक , गहुहिवरा चौक , हनुमान नगर आदी मार्गांनी नगरभ्रमण करीत पुन्हा गणेश मंदिर परिसरात येऊन संपन्न झाली . यावेळी नगरसेवक शिवशंकर ऊर्फ चिंटू वाकुडकर, नगरसेवक केतन भिवगडे तसेच परिसरातील भाविक नागरिक व महिलांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले . कोल्ड्रिंक्स , फळे , बिस्किटे , फराळी पाकिटे व भेटवस्तूंचे वाटप करून शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले . यानंतर उमाशंकर सराफ परिसरात भागवताचार्य अनुराग कृष्णजी शास्त्री यांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य व मोक्षकथेवर आधारित प्रवचन केले . सप्ताहाच्या कालावधीत दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भागवत प्रवचन होणार आहे .


या ज्ञानयज्ञ सप्ताहांतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . सोमवार (दि.५) जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता श्री पंचकुंडीय गणेश महायज्ञ , मंगळवार (दि.६) जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महायज्ञाची पूर्णाहुती व दुपारी १२ वाजता गणपती बाप्पाला १०१ किलो तिळाच्या लाडवांचा महाभोग अर्पण करून भक्तांना प्रसाद वितरण करण्यात येणार आहे . तसेच श्री राधे राधे सत्संग व श्री शिवभक्त परिवार यांच्या वतीने हळदी-कुंकू व वाण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . बुधवार (दि.७) जानेवारी रोजी महाप्रसाद वितरणाने या भक्तीमय सप्ताहाची सांगता होणार आहे . या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन गणेश उत्सव समिती कन्हानच्या वतीने करण्यात आले आहे .


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष कॅप्टन सतीश बेलसरे , कार्याध्यक्ष राजुबाबू राठी , दिलीप जैसवाल , उपाध्यक्ष प्रकाश तिवारी , संतोष पाली , सचिव शैलेश झेंडे , सहसचिव अमित थटेरे , कोषाध्यक्ष गणेश चौधरी , सहकोषाध्यक्ष चंदन सिंग यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या