प्रतिक मेश्रामने वेळेवर रक्त दिल्याने वाचले रुग्णाचे प्राण, वडिलांनी केले आजपर्यंत ४० वेळा रक्तदान
ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन येथील विलास कचरू मेश्राम यांनी जवळपास ३५ ते ४० वेळा अनेक गरजू रुग्णांना वेळेवर विनामूल्य रक्तदान करून अनेक रुग्णांचे प्राण वाचविले व सामाजिक बांधिलकी जोपासली होती. हीच परंपरा कायम राखत त्यांचा मुलगा प्रतिक विलास मेश्राम या युवकाने सुद्धा अत्यंत गरजू रुग्ण महिलेला रक्तदान करून तिचे प्राण वाचवले आहे.
रणमोचन येथील सुरेखा दिलीप ढोरे वय (४५) ही महिला गेल्या अनेक दिवसापासून किडनीच्या आजाराने ग्रस्त असून ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद हॉस्पिटल मध्ये महिलेवर उपचार सुरू असून उपचारासाठी वारंवार येणाऱ्या खर्चामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशातच वेळेवर रक्ताची गरज भासत असल्याचे डॉक्टरांनी सांगताच कुटुंबातील लोक विवंचनेत सापडले. वेळेवर त्यांना रक्ताची आवश्यक होती व ते रक्त घेणे त्यांच्यासाठी कठीण होते.
सदर महिलेचा ब्लड ग्रुप एबी पॉझिटिव असून सदर महिलेला रक्ताची नितांत गरज असल्याचा मेसेज एका ग्रुप वर व्हायरल होताच रणमोचन येथील अगोदरचे रक्तदाते विलास मेश्राम यांना कळताच त्यांनी स्वतःच्या मुलगा प्रतीक मेश्राम याला सदर प्रकाराची माहिती दिल्याने प्रतीकने होकार देत गरजू रुग्ण महिलेला वेळेवर रक्त दिले. यांच्या या धाडसामुळेच वेळीच सदर महिलेचे प्राण वाचले व वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
rahul bhoyar, bramhapuri-chandrapur


0 टिप्पण्या