वीज कर्मचाऱ्याची आत्महत्या, दोघांवर गुन्हा दाखल
मुरबाड:-
मुरबाड मधील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने विष पिऊन नदीमध्ये आत्महत्या केल्याने नदीकाठी मिळालेल्या सुसाईड नोट वरून पोलीसांनी दोघांवर आत्महत्येस प्रव्रुत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून एकास अटक केली आहे.
मुरबाड येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अंतर्गत सुरेश आहिरे (वय ५४ वर्षे) हे कर्मचारी म्हणून काम करीत होते. अत्यंत कार्यतत्पर व प्रेमळ स्वभावामुळे ते पुर्ण मुरबाड परिसरात सगळ्यांना प्रिय झाले होते.
त्यांनी मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील नदीच्या बाजूला असणाऱ्या घोडदेश्वर शिवमंदिराच्या बाजूला विष पिऊन नदीत आत्महत्या केल्याची बातमी मुरबाड मध्ये पसरताच मुरबाड पोलिस, वीज वितरण कंपनी चे कर्मचारी, आहिरे रहात असलेल्या देवगाव मधील ग्रामस्थ, मुरबाड नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी घोडदेश्वर मंदिराजवळ धाव घेऊन नदीपात्रात शोधकार्य सुरू केले.
परंतु सुरेश आहिरे यांचे प्रेत मिळाले नाही. दोन दिवसांनी याच नदीमध्ये असणाऱ्या केटी बंधाऱ्याच्या बाजूला प्रेत मिळाले. घोडदेश्वर मंदिर परिसरात आहिरे यांची मोटारसायकल, मोबाईल फोन, काही वस्तू व सुसाईड नोट मिळून आली. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहून ठेवले होते की मला प्रभाकर पाटील व संजय शिर्के यांनी दहा लाख रूपये साठी तगादा लावला होता. म्हणून मी आत्महत्या करीत आहे.
यावरून मुरबाड पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संजय शिर्के यास अटक केली आहे. याप्रकरणी मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे व पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वानाथ तोडकर हे करीत आहेत.
मुरबाड मधील एक प्रसिद्ध असा कार्यतत्पर कर्मचारी सुरेश आहिरे आपल्यातून निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी:- राजेश भांगे, मुरबाड


0 टिप्पण्या