व्यसनमुक्तीचा संकल्प करून लोककलेच्या जतनासाठी झटावे : ज्ञानेश्वर रक्षक
शाहीर कलाकारांनी समाजप्रबोधनाची जबाबदारी समर्थपणे पेलावी : शाहीर राजेंद्र बावनकुळे
कामठीत भव्य शाहीर कलाकार मेळावा व गुरुपूजा सोहळा उत्साहात संपन्न
कामठी : - लोककला ही समाजाच्या संस्कृतीची ओळख असून, तिचे जतन व संवर्धन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शाहीर कलाकारांवर आहे. कलाकारांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे करावे. आपल्या आचरणातून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी केले.
लोकशाहीर वस्ताद स्व. भीमराव बावनकुळे (गुरुजी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतीय कलाकार शाहीर मंडळ, ऑल इंडिया यांच्या वतीने श्रीराम जानकी मंगल कार्यालय, राम मंदिर, मच्छीपूल, कामठी येथे भव्य शाहीर कलाकार मेळावा व गुरुपूजा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला विदर्भातील विविध भागांतून शाहीर, लोककलावंत व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी बदलत्या काळात पारंपरिक लोककलेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कलाकारांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. लोककलेच्या माध्यमातून समाजातील विविध समस्या, सामाजिक कुप्रथा व व्यसनांविरोधात जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी व्यसनमुक्त कुटुंब हेच सुखी कुटुंब असल्याचे सांगत प्रत्येकाने व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. माजी महापौर शेखर सावरबांधे यांनी सर्व शाहीर कलाकारांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी व मागण्यांसाठी संघर्ष केल्यास त्या लवकर पूर्ण होण्यास मदत होईल, असे सांगितले. शिवसेना नेते राधेश्याम हटवार यांनी शाहीर कलाकारांच्या मागण्यांसाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अनुसया बावनकुळे, शाहीर स्व. महादेव पारसे यांच्या पत्नी बेबी पारसे, पुत्र घनश्याम, नृत्यकलाकार दीपक दहीकर तसेच भजनकलाकार स्व. गणेश बांगडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन राधेश्याम हटवार, शेखर सावरबांधे, ज्ञानेश्वर रक्षक, शाहीर बहादूला बराडे, चंद्रशेखर अरगुलेवार, नितीन पाटील, ॲड. बागडे, संपादक जब्बार, मदन शेंडे, शाहीर अरुण मेश्राम, शाहीर ललकार चौहान, शाहीर विक्रम वांढरे, शाहीर गजानन वडे, हरिचंद कावळे, कल्पना बांगडकर, विमल शिवारे व नरेंद्र दंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला. संगीत विशारद नरेंद्र म्हल्ले, शाहीर गजानन वडे, विनायक नागमोते, उपस्थित पत्रकार तसेच बाल तबलावादक छगन बावनकुळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मेळाव्यात महिला भजन मंडळ, डहाका, खडीगमत, दंडार, लोककला, लावणी, व्यसनमुक्ती व लोककल्याण अशा विविध विषयांवर आधारित पोवाडे, नाटिका व लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. कलाकारांच्या दमदार सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. सहभागी कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते निःशुल्क प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाहीर भूपेश बावनकुळे, गिरीधर बावणे, शालिक शेंडे, प्रफुल भनारे, दादू सावरकर, सौ. अरुणा बावनकुळे, सौ. चेतना शेंडे, सौ. वंदना घुमडे, सौ. विमल वडे, शोभा मंगर, यशोदा सोमनाथे, सुभाष देशमुख, नथुजी चरडे, शाहीर ब्रह्म नवघरे, रवींद्र मेश्राम, लिलाधर वडांद्रे, हरिचंद शहारे, डोये, तुळशीराम हुकरे, धनलाला जैतवार, रामराव वडांद्रे, निळकंठ बोपचे व देवेंद्र कटरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या