Advertisement

बीकेसीपी शाळेसमोर कचरा, सांडपाणी व पाईपलाईन गळतीचा गंभीर प्रश्न

 


बीकेसीपी शाळेसमोर कचरा, सांडपाणी व पाईपलाईन गळतीचा गंभीर प्रश्न


नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे १,५०० विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर संकट ; नागरिकांचा संताप


कन्हान : - कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे बीकेसीपी शाळेसमोरील परिसरात कचरा, सांडपाणी आणि पाईपलाईन गळतीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तब्बल १,५०० विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वच्छतेच्या नावाने मोठमोठे दावे करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.


स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपरिषदेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांकडून शाळेजवळच कचरा टाकला जात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यातच काही नागरिकांकडूनही त्याच ठिकाणी शेण व इतर घनकचरा टाकला जात असल्याने मुख्य नाली वारंवार तुंबत असून संपूर्ण परिसर दुर्गंधीने व्यापला आहे. यामुळे नालीतील घाण पाणी थेट शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचत आहे.


दररोज शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना या घाणीमधून मार्ग काढावा लागत असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. एवढेच नव्हे तर परिसरातील पिण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याने पाणीही शाळा परिसरात साचत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याची तीव्र भावना पालक व नागरिकांनी व्यक्त केली आहे.


विशेष म्हणजे, नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने बीकेसीपी शाळेच्या प्रशासनालाच स्वखर्चाने जेसीबी लावून परिसराची साफसफाई करावी लागली, ही बाब नगरपरिषद प्रशासनासाठी लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. शाळेचे सुपरवायझर युनिक कादरी यांनी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, मुख्य नालीची साफसफाई करावी तसेच गळतीची पाईपलाईन त्वरित दुरुस्त करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची होणारी हेळसांड थांबवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.


यावेळी समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार, नितीन मेश्राम, प्रविण समुद्रे, राकेश गावंडे, मनोज मेश्राम आणि गजराज यादव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून नगरपरिषद प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या