Advertisement

सिलंबम स्पर्धेत शिवशंभु आखाडाच्या खेळाडूंची दमदार कामगिरी ; एकुण ४६ मेडल पटकावले


सिलंबम स्पर्धेत शिवशंभु आखाडाच्या खेळाडूंची दमदार कामगिरी ; एकुण ४६ मेडल  पटकावले


१३ सुवर्ण, २५ रौप्य व ८ कांस्य पदकांची कमाई ; कन्हान परिसरात जल्लोष


कन्हान : - रामटेक येथे आयोजित दोन दिवसीय सिलंबम स्पर्धेत शिवशंभु आखाडा कन्हान, कांद्री, टेकाडी व निलज येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल ४६ पदके पटकावली . या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण कन्हान परिसरात खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .


छत्रपती बहुउद्देशीय संस्था, रामटेक आमदार क्रीडा महोत्सव समिती तसेच शिवसेना मित्र परिवार व महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक येथील गांधी चौकात या दोन दिवसीय सिलंबम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झाले. यावेळी रामटेक नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा. बिकेंद्र महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.


या स्पर्धेत शिवशंभु आखाडाच्या खेळाडूंनी कोच अनिकेत निमजे व प्रशिक्षक गुंडेरावजी चकोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला. कन्हान, कांद्री, टेकाडी व निलज येथील खेळाडूंनी आपल्या कौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार सादर करत १३ सुवर्ण, २५ रौप्य आणि ८ कांस्य पदके अशी एकूण ४६ पदके पटकावून कन्हान परिसराचे नाव उज्ज्वल केले.


स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. स्पर्धेनंतर खेळाडूंचे कन्हान नगरीत आगमन होताच स्थानिक नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि जल्लोषात स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.


शिवशंभु आखाडाच्या या यशस्वी कामगिरीमुळे परिसरातील युवकांमध्ये क्रीडा क्षेत्राबाबत नवचैतन्य निर्माण झाले असुन खेळाडुंनी कन्हान परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .


सह संपादक - ऋषभ बावनकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या