स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिक आक्रमक ; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात संतापाची लाट
जुने मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती तात्काळ बंद करा – नागरिकांची मागणी
कन्हान : - महावितरणकडून शहर व परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये जुने व कार्यरत वीज मीटर काढून नव्याने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविली जात असून, या मीटरमुळे वीजबिलात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाढीव वीजबिलांमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असून महावितरणच्या या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी रामटेकचे खासदार शामकुमार बर्वे यांना निवेदन देऊन स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. महावितरणकडून नागरिकांच्या संमतीशिवाय मीटर बदलण्याची सक्ती केली जात असून, यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष वाढत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, जुन्या मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात अनपेक्षित वाढ होत असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य, मध्यमवर्गीय आणि गोरगरीब कुटुंबांना बसत आहे. आधीच वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींनी जनता त्रस्त असताना महावितरणकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अतिरिक्त आर्थिक भार लादला जात असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी प्रशांत मसार यांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत असताना महावितरण मात्र मीटर बदलण्याचा हट्ट सोडत नाही. हा सर्वसामान्य ग्राहकांवर अन्याय असून तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी मोतीराम रहाटे, सत्तूभाई मारशेट्टी, चंदन मेश्राम, रमेश चव्हाण, उमेश यादव, देवा चतुर, अशोक मेश्राम, सुभाष बावणे, सुनिल दूधबावणे, प्रदीप नाटकर, संदीप पंधराम, प्रल्हाद पहाडे, दुर्गेश बर्वे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात कन्हान परिसरात जनक्षोभ वाढत असून महावितरणच्या धोरणाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या