कांद्री नगरपंचायतीत पदग्रहण सोहळा उत्साहात
नगराध्यक्ष सुजीत पानतावणे यांनी स्वीकारला पदभार
कन्हान : - कांद्री नगर पंचायत येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुजीत पानतावणे व विजयी नगरसेवक-नगरसेविकांचा पदग्रहण सोहळा सोमवारी (दि. १२) जानेवारी रोजी पंचायत कार्यालयाच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला . या कार्यक्रमात राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल व भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .
राज्यमंत्री अॅड.आशीष जयस्वाल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की , निवडणुकीतील विजय म्हणजेच जनतेच्या अपेक्षांची जबाबदारी स्वीकारणे होय . मतदारांनी विकासाच्या आशेने विश्वास दिला असून , त्यांच्या समस्या सोडविणे व मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे हे लोकप्रतिनिधींचे प्रथम कर्तव्य आहे . विवेकपूर्ण वर्तन ठेवा आणि कामातून आपली ओळख निर्माण करा , असा संदेश त्यांनी दिला . भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनी ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत जनतेशी सतत संपर्क ठेवण्याचे आवाहन केले .
पदग्रहण सोहळ्यापूर्वी मान्यवरांनी भारत माता , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते सर्व विजयी नगरसेवक व नगरसेविकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुजीत पानतावणे यांचा सत्कार नगर पंचायतीचे मुख्याधिकारी निलेश गाढवे यांच्या हस्ते करण्यात आला . तसेच गटनेते अतुल हजारे व उपगटनेते शिवशंकर चकोले यांचाही सत्कार करण्यात आला .
यावेळी नगराध्यक्ष सुजीत पानतावणे यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानत भारतीय संविधानाला साक्षी ठेवून कांद्री शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला . सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून नगरपंचायतीचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगर पंचायतीच्या वतीने समन्वयक चंदा वैद्य यांनी स्वागत केले . कार्यक्रमाचे संचालन सौरभ पोटभरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोहित चकोले यांनी मानले .
या पदग्रहण सोहळ्यास नगरसेवक चंद्रपाल महाजन , शिवशंकर चकोले , उमेश वाडीभस्मे , धर्मेंद्र सरोदे , सिताराम नाटकर , अतुल हजारे , राकेश लांजेवार , निकेश मेश्राम तसेच नगरसेविका मिनाक्षी भुते , सविता राऊत , शुभांगी कुंभलकर , माधुरी मस्के , आरती कोटपल्लीवार , रिता मस्के , संघमित्रा डोंगरे , रोशनी गजभिए , नितु परते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या