Advertisement

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कन्हान पोलिसांकडे सुरक्षा व वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याची मागणी


आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कन्हान पोलिसांकडे सुरक्षा व वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याची मागणी


कन्हान : - आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कन्हान परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी कन्हानमधील जागरूक नागरिकांनी कन्हान पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर केले. सामाजिक कार्यकर्ते संदीप शेंडे व नितीन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. 


आगामी काळात पोळा, गणेशोत्सव, दुर्गापूजा, धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच दीवाळी यांसारखे प्रमुख सण येत असून, या काळात कन्हान शहरातील मुख्य बाजारपेठा, चौक, रस्ते तसेच विविध मंडळांच्या पंडालांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी असते.


या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सण-उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.


निवेदनातून मुख्य बाजारपेठा व संवेदनशील ठिकाणी महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करावा, दिवस-रात्र पोलिस गस्त वाढवावी, गर्दीच्या मार्गांवर वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करावी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती करावी तसेच मुख्य चौक व पंडाल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.


सण-उत्सवांच्या काळात नागरिकांनी ही पोलिस प्रशासनाला सहकार्य करून शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कन्हान पोलिस प्रशासनाकडून यंदाही प्रभावी सुरक्षा व्यवस्था राबवून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले जाईल, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.


यावेळी कन्हान परिसरातील अनेक जागरूक व गणमान्य नागरिक उपस्थित होते.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या